April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

Photo/Google

Photo/Google

ठाणे : जिल्ह्यात उद्यापासून १२ ते १४ वर्ष वयोगटातील लाभार्थींचे लसीकरण

ठाणे

ठाणे जिल्हा ग्रामिण कार्यक्षेत्रात ६० वर्षावरील सर्व नागरिकांसाठी खबरदारी डोस व १२ ते १४ वर्ष वयोगटातील लाभार्थींच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास १६ मार्च (उद्या) पासून प्रारंभ होत आहे. या मोहिमेचा शुभारंभ प्राथमिक आरोग्य केंद्र सरळगाव (ता. मुरबाड), प्राथमिक आरोग्य केंद्र कोन (ता. भिवंडी), प्राथमिक आरोग्य केंद्र निळजे (ता. कल्याण) व मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर-३ येथे करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी सांगितले.

१२ ते १४ वर्ष वयोगटातील लाभार्थीच्या लसीकरणाकरिता मार्गदर्शक सुचनांनुसार फक्त कॉर्बोव्हॅक्स (Corbevax) लसीचा वापर करण्यात येणार असुन फक्त शासकिय कोविड लसीकरण केंद्रांवर ही लस उपलब्ध असणार आहे, असे जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. अंजली चौधरी यांनी सांगितले.

या लसीचे दोन डोस लाभार्थीला २८ दिवसांच्या अंतराने देण्यात येणार आहेत. ०१ जानेवारी २००८ ते १५ मार्च २०१० पर्यंत जन्मलेली मुले सध्या लसीकरणासाठी पात्र आहेत. मोहिमेचा शुभारंभ मुरबाड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सरळगाव, भिवंडी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कोन, कल्याण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र निळजे व मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर -३ येथे करुन टप्याटप्याने सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामिण रुग्णालय व जिल्हा रुग्णालय येथे लसीकरण सत्रांचे आयोजन केले जाईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. परगे यांनी सांगितले.

तीव्र स्वरूपाच्या कोविड संसर्गापासून बालकांचे संरक्षण करण्याकरीता सर्व पालकांनी १२ ते १४ वयोगटातील मुलांचे लवकरात लवकर लसीकरण करण्याकरीता जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पा गणेश पाटील, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष गोटिराम पवार तसेच आरोग्य सभापती वंदना किसन भांडे यांनी आवाहन केले आहे.