April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

वयाची पंचाहत्तरी ओलांडलेल्या महिलांचा गौरव

वयाची पंचाहत्तरी ओलांडलेल्या महिलांचा गौरव

कल्याण : छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्यातील महिलांच्या कार्यकर्तृत्वाची नोंद इतिहासकारांनी घेतली नाही

सीकेपी संस्थेतर्फे ज्येष्ठ महिलांच्या समारंभात प्राप्रधान यांची खंत

कल्याण

हिंदवी स्वराज्यातील स्त्रीयांचे कार्यकर्तृत्व मोठे होते. जिजाऊंपासून छत्रपतींच्या पत्नी, लेकी, सुनांसह अनेक महिलांनी स्वराज्यासाठी दिलेल्या योगदानाची इतिहासकारांनी नोंद घेतली नाही अशी खंत इतिहासाच्या अभ्यासक प्रा. शिल्पा प्रधान यांनी व्यक्त केली आहे.

चांद्रसेनिय कायस्थ प्रभू संस्था तथा सीकेपी संस्थेतर्फे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त कल्याणच्या महिला मंडळ सभागृहात वयाची पंचाहत्तरी ओलांडलेल्या महिलांचा गौरव करण्यात आला. त्या समारोहात प्रा. प्रधान बोलत होत्या. समारोहास संत साहित्यातील लेखिका प्रा. डॉ. राधिका गुप्ते प्रमुख पाहुण्या तसेच संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर देशपांडे व्यासपिठावर उपस्थित होते.

इतिहासाच्या अभ्यासिका असलेल्या प्रा. प्रधान यांनी आपल्या ओघवत्या वाणीने सुमारे एक तास उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. आजच्या आधुनिक काळातील आजीबाईंनी जिजाऊंप्रमाणेच घरातील बाळ गोपाळांना रामायण महाभारत व शिवकालीन गोष्टी त्यांच्या कलाप्रमाणे आणि बदलत्या काळानुसार डिजिटल पध्दतीने सांगितल्यास आजीचे महत्व टिकून राहिल व पुन्हा एकदा शिवकालाचा प्रत्यय येईल असे सांगत प्रा. प्रधान यांनी शिवकालिन स्त्रीयांचे कार्यकर्तृत्व छत्रपतींच्या मातोश्री जिजाऊंंपासून त्यांच्या पत्नी, लेकी, सुना इत्यांदींनी छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्यासाठी दिलेले योगदान आपल्या रसाळ वाणीने कथन केले. दुर्देवाने, इतिहासकारांनी या महिलांची अपेक्षित अशी नोेंद घेतली नाही अशीही खंत त्यांनी व्यक्त केली. शिवकालातील या महिलांनी दाखविलेली कार्यतत्परता, दिलेले न्यायनिवाडे, निर्णय आदींची सविस्तर माहिती उदाहरणांसह सादर केली. छत्रपती पावनखिंडीतून विशालगडावर गेले त्याचे कारण छत्रपतींच्या पत्नी विचारे यांचे वडीलांच्या ताब्यात तो गड होता. छत्रपतींनी सुरक्षित जागा म्हणूनच विशालगडाची निवड केली. शिवकालातील अनेक घटना त्यांनी श्रोत्यांसमोर उभ्या केल्या.

कुटुंबसंस्था, संस्कार, सुसंवाद अशा अनेक पैलूंवर प्रकाश टाकतांना प्रा. गुप्ते यांनी महिला या पुरुषांपेक्षा अधिक सहनशिल, कार्यतत्पर व कुटुंब साधणारा दुवा आहेत. महिलांचा आदर हा फक्त एका दिवसापुरता न करता तो कायम केला गेला पाहिजे असे सांगितले.

या समारोहात वयाचा अमृतमहोत्सव तथा पंचाहत्तरी साजरी करणार्‍या महिलांचा प्रा. प्रधान व डॉ. प्रा. राधिका गुप्ते यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. अनेक ज्येष्ठ भगिनींनी हा आपल्या आयुष्यातील पहिलाचा सत्कार असल्याचे सांगून समारोहात आपलेपणा निर्माण केला. या समारोहात सीकेपी संस्थेच्या मार्गदर्शिका मृणाल दुर्वे व अंबरनाथच्या गौरी मथुरे यांचा सत्कार करण्यात आला.

संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. सीकेपी समाजाच्या पहिल्या महिला बचत गटाची माहिती दिपाली गुप्ते यांनी सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची गडकरी यांनी केले. समारोहाच्या यशस्वीतेसाठी दिपाली गुप्ते, शफाली प्रधान, सुचेता चौबळ, वृषाली देशमुख, पुरुषोत्तम फडणीस, तेजस महागावकर, सुभाष कुळकर्णी, आशिष कर्णिक, चंद्रशेखर राजे इत्यांदींनी मेहनत घेतली.