April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

पदाधिकाऱ्यांना सुरक्षा रक्षकांकरवी करण्यात आला मज्जाव

पदाधिकाऱ्यांना सुरक्षा रक्षकांकरवी करण्यात आला मज्जाव

कल्याण : केडीएमसी ठरतेय मोठ्या घराचा पोकळ वासा

वालधुनी नदी संवर्धनासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका उदासीन

कल्याण

वालधुनी नदी संवर्धनासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका उदासीन दिसत असून छोट्या नगरपालिका आणि महानगरपालिका वालधुनी संवर्धनासाठी प्रामाणिकपणे काम करत असताना केडीएमसी मोठ्या घराचा पोकळ वासा ठरत असल्याची टीका वालधुनी नदी स्वच्छता समितीने केली आहे.

वालधुनी नदी दोन महानगरपालिका आणि एका नगरपालिका क्षेत्रातून वाहते. त्यातील अंबरनाथ नगरपालिका आणि उल्हासनगर महानगरपालिका अतिशय प्रामाणिकपणे या नदी संवर्धनासाठी काम करताना दिसत आहेत. त्यांचे प्रयत्न जरी त्यांच्या बजेटच्या मानाने तोकडे पडत असले तरी त्यांचा हेतू प्रामाणिक आहे. हे त्यांनी वेळोवेळी कृतीतून दाखवून दिले आहे. मग ते दर तीन महिन्यांनी नदीतील गाळ काढण्याची प्रक्रिया असो अथवा नागरिक आणि संस्थांच्या माध्यमातून नदी संवर्धनासाठी केलेली कामे असोत. नेहमीच या दोहींचा प्रामाणिक हेतू अधोरेखित झाला आहे.

असे असताना, केडीएमसी क्षेत्रातील नागरिक, उल्हास नदी आणि वालधुनी नदी यांच्या संगमानजीक वास्तव्यास असताना आणि या नदीच्या पुराचा अधिक फटका केडीएमसी क्षेत्रातील रहिवाशांना बसत असताना महापालिका प्रशासन नागरिकांनी केलेल्या सुचनांना थेट केराची टोपली दाखवत आहे. अशी येथील कार्यकर्त्यांची भावना व अनुभव झालेला आहे.

नदी स्वच्छता आणि संवर्धनासाठी नागरी सुविधा केंद्राद्वारे अनेक निवेदने देण्यात आली़. या नदीतील गाळ काढण्यात यावा अशी मागणी, शहर अभियंता सपना कोळी यांना गेल्या सहा महिन्यापूर्वी प्रत्यक्ष भेटून करण्यात आली. त्यांनी प्रत्यक्ष नदी किनारी येऊन पाहणी करते असे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांना परत भेटून याचे स्मरण करून  देखील त्यांना नदीची पाहणी करण्यासाठी अद्याप वेळ मिळालेला नाही.

त्यानंतर वालधुनी नदी स्वच्छता समिती तर्फे आयुक्तांना वालधुनी नदीसंबंधी चर्चा करण्यासाठी लेखी स्वरुपात रीतसर मागणी करण्यात आली. त्यांच्याकडून देखील कित्येक महिने कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने वालधुनी नदी स्वच्छता समिती पदाधिकाऱ्यांनी  महापालिकेच्या या अनास्थेबाबत आक्षेप नोंदवण्यासाठी आणि अधिकाऱ्यांच्या वालधुनी नदी संवर्धनाकडे दुर्लक्ष करण्याच्या कार्यशैलीचा निषेध करण्यासाठी, निवेदन घेऊन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या कार्यालयामध्ये जाण्याचा प्रयत्न केला असता सर्व पदाधिकाऱ्यांना सुरक्षा रक्षकांकरवी मज्जाव करण्यात आला.

या प्रसंगी अध्यक्षा पुष्पा रत्नपारखी, सुनिल उतेकर, विनोद शिरवाडकर, गणेश नाईक, पंकज डोईफोडे, नितीन गायकवाड, अनिल गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थितीत होते.

शेवटी आयुक्तांना न भेटताच, सहाय्यकांना निवेदन देऊन पदाधिकाऱ्यांना परतावे लागले. या निवेदनात महापालिकेच्या सुस्त प्रशासनाविरोधात स्वच्छता समिती तर्फे तीव्र नागरी आंदोलने उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.