April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

Image/Google

Image/Google

महाराष्ट्र : होळी सणानिमित्त कोकणात एसटीच्या १०० विशेष गाड्या

परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांची माहिती

मुंबई

होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळाने नियमित बसेस व्यतिरिक्त १०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला असून १६ ते २७ मार्च २०२२ दरम्यान या गाड्या कोकणातील मार्गावरून धावणार आहेत, तसेच एसटी संपाचा गैर फायदा घेवून खासगी बसेसनी प्रवाशांकडून ज्यादा भाडे आकारु नये, याबाबत प्रवाशांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. ज्यादा भाडे घेऊन प्रवाशांची लुटमार करणाऱ्या दोषींवर परिवहन आयुक्त यांनी कारवाई करावी, असे आदेश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिले.

होळी सणानिमित्त मोठ्या प्रमाणात नागरिक आपल्या गावी जात असतात. एसटी महामंडळाचा संप काही ठिकाणी अद्याप सुरु असल्याने खासगी बसेस प्रवाशांची अडवणूक करुन अधीक दर आकारत आहेत. अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीची तातडीने दखल घेवून याबाबत परिवहन आयुक्त यांनी तपास पथक नेमून कारवाई करावी, असे आदेश परिवहन मंत्री ॲड.परब यांनी दिले.

गणेशोत्सवाबरोबरच होळीचा सणही कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणासाठी मुंबईहून लाखो चाकरमानी कोकणातील आपापल्या गावी जात असतात. त्यामुळे या सणाच्या काळात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. अशा प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी सज्ज झाली असून महामंडळाने यंदा १०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, बोरिवली, ठाणे, वसई, नालासोपारा तसेच पनवेल येथील आगारांतून खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी आदी भागात या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. जादा बसेस सोडण्यासाठी वाहतूक विभागाने पूर्ण तयारी केली असून पुणे, सातारा, सांगली आदी भागातून जादा बसेस मागविण्यात आल्या आहेत. तसेच गाड्यांचे नियोजन करण्यासाठी आगारांत एसटीचे अधिकारी व पर्यवेक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे, असे सांगून सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी एसटीच्या बसेसमधून प्रवास करावा, असे आवाहनही ॲड. परब यांनी केले आहे.