April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

KDMC : नेत्रदानाची सुविधा आता बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात उपलब्ध

कल्याण

केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महापालिका क्षेत्रात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याबरोबरच महापालिकेची आरोग्य सुविधा सुधारण्यावरही भर दिला आहे. नागरिकांच्या सेवेकरीता बाई रुक्मिणीबाई रुग्णालय, शास्त्रीनगर रुग्णालय आणि वसंत व्हॅली येथील रुग्णालय (प्रसुतीगृह) अशी ३रुग्णालय उपलब्ध असून सर्व सामान्य गरजू रुग्णांसाठी आता बाई रुक्मिणीबाई रुग्णालय, कल्याण व शास्त्रीनगर रुग्णालय, डोंबिवली येथे फिजीशीयन, नेत्रचिकित्सक तज्ञ, कान, नाक, घसा तज्ञ (ENT) या तज्ञ डॉक्टरांच्या सेवा मार्च २०२१ पासून उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. आणि आता नेत्रदानाची सुविधा देखील बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात २४ तास उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात प्राप्त होणाऱ्या शवांचा प्रथम पंचनामा केला जातो आणि नेत्रदान हे श्रेष्ठदान असल्यामुळे त्यानंतर सदर मृत व्यक्तिंच्या नातेवाईकांचे नेत्रदानासाठी समुपदेशन (Counseling) केले जाते. चेह-याचे विद्रुपीकरण होईल या भितीतून मरणोत्तर नेत्रदान करण्यास नातेवाईक तयार नसतात. याकरीता नेत्रदानामुळे मृत व्यक्तिचा चेहरा विद्रुप होणार नाही याबाबत संबंधित नातेवाईकांचे समुपदेशन करण्यात येते. महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी मातोश्री गोमतीबेन रतनशीभाई छेडा सहियारा आय बँक या संस्थेबरोबर सामंजस्य करार केला असून महापालिका आणि मातोश्री गोमतीबेन रतनशीभाई छेडा सहीयारा आय बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ३ मार्च २०२२ पासून बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात नेत्रदानाची सुविधा उपलब्ध झाली असून आतापर्यंत ३ मृत व्यक्तींचे नेत्रदान करण्यात आले आहे. नेत्रदान करणे संदर्भात अर्ज रुक्मिणीबाई रुग्णालयात उपलब्ध असल्याची माहिती मुख्य वैदयकीय अधिकारी डॉ. पुरुषोत्तम टिके यांनी दिली.