April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

ठाणे : गॅस सिलिंडरच्या स्फोटात चौघे जखमी

ठाणे

कळवा पूर्व शिवशक्ती नगर येथील बैठ्या चाळीत स्वयंपाक करताना अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली. या स्फोटात घराचे पत्रे फुटले असून घरात असलेले चौघे जण जखमी झाले आहेत. ते चौघे त्या परिसरात असलेल्या गॅस एजन्सीमधील कामगार असून ते सर्व जण ७० ते ८० टक्के भाजले असून त्यांना उपचारार्थ कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातून मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

कळवा पूर्व शिवशक्ती नगर परिसरात रणजित सिंग यांच्या मालकीची भारत गॅस नामक एजन्सी आहे. तेथे काम करणाऱ्या कामगारांसाठी त्यांनी त्याच परिसरात बैठ्या चाळीत रूम घेऊन दिली आहे. तळ अधिक १ मजली असलेल्या रूममध्ये स्वयंपाक सुरू असताना अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास झाला त्यावेळी घरामध्ये सत्यम मंगल यादव (२०), अनुराज सिंग (२९), रोहित यादव (२०) आणि गणेश गुप्ता(१९) हे कामगार असल्याने ते भाजले आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि कळवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत,भारत गॅस एजन्सी मधील एकूण ११ खाली झालेले गॅस सिलेंडर बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी ठेवले आहेत. तर सर्व कामगार ७० ते ८० टक्के भाजले असून त्यांच्या प्राथमिक उपचारानंतर रात्री एकच्या सुमारास त्या चौघांना कस्तुरबा रुग्णालय येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे असे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे CMO डॉक्टर दत्तात्रेय कोले यांनी कळविले अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.