April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

विरार : थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित ग्राहकांकडून वीजचोरी

अर्नाळा येथील चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल

विरार

थकीत वीजबिलापोटी वीजपुरवठा खंडित करून वीज मीटर काढल्यानंतरही वीजचोरी करणाऱ्या विरार पश्चिम उपविभागातील अर्नाळा येथील चार ग्राहकांविरुद्ध महावितरणच्या पथकाने कारवाई केली आहे. संबंधित चारही ग्राहकांवर भारतीय दंड विधानाच्या कलम ३७९ (चोरी), ३४ (संगनमत) तसेच वीज कायदा २००३ च्या कलम १३५ (वीजचोरी) अन्वये गुन्ह्याची नोंद झाली आहे.

थकबाकीमुळे नारायण भिवा मेहेर (बचावपाडा, अर्नाळा), जे. आर. तांडेल (बंदरपाडा,अर्नाळा), निलोफर समीर चाऊस (एसटी पाडा, अर्नाळा), महादेव दामोदर पाटील (धर्मेश्वर पाडा, अर्नाळा) या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करून मीटर काढण्यात आले होते. त्यानंतरही या ग्राहकांकडून आकडे (हूक) टाकून विजेचा चोरटा वापर सुरू असल्याचे महावितरणच्या पथकाने त्यांच्याकडे केलेल्या तपासणीत आढळून आले. यांदर्भात सहायक अभियंता अशोक मेश्राम यांच्या फिर्यादीवरून मेहेर याने ५१ हजार ३७०, तांडेल याने १४ हजार ८५०, चाऊस याने ४३ हजार ५३० व पाटील याने ७८ हजार ८०० रुपयांची वीजचोरी केल्याचा गुन्हा अर्नाळा पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. विरार पश्चिम उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत येंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

थकबाकीपोटी एकदा वीजपुरवठा खंडित केल्यानंतर थकीत वीजबिलाचा भरणा व पुनःर्जोडणी शुल्क भरल्याशिवाय संबंधित ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत केला जात नाही. तर अशा ग्राहकांनी परस्पर वीजजोडणी, शेजारी किंवा इतरांकडून वीज घेतल्याचे आढळून आल्यानंतर संबंधित ग्राहक व त्यांना वीज पुरविणारा अशा दोघांविरुद्धही फौजदारी व दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्यासाठी थकबाकीपोटी वीज खंडित केलेल्या ग्राहकांच्या वीज वापरावर पथकांमार्फत विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.