October 20, 2025

news on web

the news on web in leading news website

पत्रकारांनी सकारात्मक कार्याची दखल घ्यावी : राज्यपाल

मुंबई

ध्येयनिष्ठ व निर्भीड पत्रकार समाजाला प्रतिबिंब दाखवत असतात. समाजातील त्रुटींवर बोट ठेवत असताना चांगल्या कामाची दखल घेणे हेदेखील तितकेच आवश्यक आहे, असे सांगून पत्रकारांनी सकारात्मक कार्य करणाऱ्यांना देखील कौतुकाची थाप द्यावी, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे केले.

विश्व संवाद केंद्र, मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारे २१ वे देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते बुधवारी राजभवन, मुंबई येथे प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

ज्येष्ठ पत्रकार प्रकाश जोशी यांना यावेळी पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल व समाज माध्यम क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना देखील राज्यपालांच्या हस्ते देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

शाश्वत जीवन मूल्यांवर आधारित चांगली पत्रकारिता करणाऱ्या गुणी पत्रकारांना शोधून सन्मानित करीत असल्याबद्दल राज्यपालांनी विश्व संवाद केंद्राचे कौतुक केले.

राज्यपालांच्या हस्ते ज्ञानदा कदम (एबीपी माझा), आलोक निरंतर (व्यंगचित्रकार), दीपक जोशी (छायाचित्रकार), दिनेश कानजी (वृत्तसंकेतस्थळ न्यूज डंका) अश्विन अघोर (घनघोर युट्यूब चॅनल), प्राजक्ता हरदास (गुणवंत पत्रकार विद्यार्थिनी), रोहित दलाल (समाजमाध्यम), अभिराज राजाध्यक्ष आणि नियती माविनकुर्वे, आकाश सुभाष नलावडे व अभिजित चावडा (समाजमाध्यमे) यांना २१ वे नारद पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आले.

यावेळी विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष सुधीर जोगळेकर, निवड समितीच्या सदस्य वैजयंती आपटे तसेच कोकण प्रांताचे संघचालक डॉ सतीश मोध यांनी आपले मनोगत व्यक्त केले.