April 19, 2025

news on web

the news on web in leading news website

वृद्धाचे अपहरण करणाऱ्या तिघांना Manpada पोलिसांनी केली अटक

डोंबिवली : एका ६५ वर्षीय वृद्धाचे अपहरण करून पैशांची मागणी करणाऱ्या मनजीत यादव याच्यासह त्याचे दोन साथीदार धनंजय यादव आणि सोमप्रकाश यादव या तिघांना मानपाडा पोलिसांनी अटक केली.

मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रारदार खमनी बॅनर्जी यांनी १ जानेवारी रोजी त्यांचे पती सुभाषिश बॅनर्जी (६५) यांना त्यांच्या घरातुन मनजीत कुमार यादव व त्याचे दोन साथीदार यांनी पाच लाख रुपयांसाठी जबरदस्तीने अपहरण करुन नेल्याचे सांगितले. घटनेचे गांभीर्य ओळखुन मानपाडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी लागलीच सपोनिरी दत्तात्रय सानप यांना तक्रारदार यांची तक्रार घेवुन त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यास सांगितले.

डोंबिवलीत राहणारे सुभाशिष हे शिपींग एजंट आहेत. त्यांना मनजीत यादव या शिपींग एजंटने तीन तरुणाना शिपिंगमध्ये कामाला लावण्यासाठी तीन लाख रुपये दिले. सुभाषित यांनी या तीन तरुणांसाठी काम शोधले. त्यांचा व्हिजा तयार केला. यासाठी मनजीत याने दिलेले पैसे खर्च झाले. या तीन तरुणांची श्रीलंकेस जाण्याकरिता तारीख निश्चीत झाली. मात्र तिघांची कोरोना टेस्ट पॉझीटीव्ह आल्याने तिघांना क्वारंटाईन करण्यात आले. १५ दिवस क्वारंटाईन असल्याने व्हिजाची मुदत संपली. मनजीतने दिलेल्या पैशाचा तगादा लावण्यास सुरुवात केली.

यावेळी सर्व पैसे खर्च झाल्याचे सुभाषित यांनी सांगितले. मात्र मनजीत याने धनंजय यादव आणि सोमप्रकाश यादव यांच्यासोबत सुभाषित यांचे अपहरण केले. सुभाषित यांच्या अपहरण प्रकरणी त्यांच्या पत्नीने मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर मानपाडा पोलिसांनी तपास सुरु केला. याच दरम्यान मनजीत हा सुभाषित यांच्या पत्नीला वारंवार फोन करुन पाच लाख रुपयांची मागणी करीत होता. पैसे दिले नाही तर सुभाषित यांना जीवे ठार मारुन टाकण्याची धमकी देत होता. इतकेच नाही तर अकाऊंटमध्ये पैसे टाकण्यास सांगितले. ज्या अकाऊंटमध्ये पैसे जमा झाले त्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच तांत्रिक बाबींच्या आधारे मानपाडा पोलिसांनी नालासोपारा येथील गोराई नाक्याजवळील एका हॉटेलमध्ये छापा मारला. येथून अपहरण झालेल्या सुभाषित यांची सुटका करून मनजीत यादव याच्यासह धनंजय यादव आणि सोमप्रकाश यादव यांना ताब्यात घेतले. आरोपी हे मूळचे उत्तर प्रदेशमध्ये राहणारे असून मानपाडा पोलीस पुढील तपास करीत आहेत.