अनागोंदी कारभाराबाबत नरेंद्र पवार करणार राज्य सरकारकडे चौकशीची मागणी
5 ऑगस्टला बाजार समिती लाक्षणिक बंद ठेवण्याची केली घोषणा
कल्याण
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वत्र चिखल, घाण, दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यांची दुरावस्था, व्यापाऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. त्याचप्रमाणे बाजार समितीमध्ये अनधिकृत गाळे बांधून कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार केला असल्याच्या तक्रारी बाजार समितीतील शेतकरी, व्यापारी, माथाडी, हमाल व ग्राहक यांनी कल्याण पश्चिमेचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्याकडे केल्या होत्या. या तक्रारीनुसार पवार यांनी मंगळवारी १ ऑगस्ट रोजी पाहणी दौरा केला. यावेळी तेथील अनागोंदी कारभार पाहून बाजार समितीचे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करा व भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्याची मागणी राज्य सरकारकडे करणार आहे. तसेच या कारभारा विरोधात ५ ऑगस्ट रोजी माजी आमदार पवार यांच्या नेतृत्वात मार्केट लाक्षणिक कडकडीत बंद ठेवण्याची घोषणा शेतकरी, व्यापारी, माथाडी व हमाल यांनी केली.
यावेळी फळ व भाजीपाला घाऊक विक्रेता संघाचे कार्याध्यक्ष गणेश पोखरकर, ज्येष्ठ व्यापारी सय्यद कासम, शफीक बागवान, चक्रधर येवले, जयप्रकाश गुप्ता, बाळासाहेब करंडे, सुखदेव करंडे, सुशील येवले, विलास पाटील, उमाशंकर वैश्य, शंभु गुप्ता, अमरजीत गुप्ता, राम पोखरकर, शांताराम ढोबळे, दत्ता बारवे, निवृत्ती खरमाळे, प्रफुल्ल घोणे आदी उपस्थित होते.
बाजार समितीतील समस्यांबाबत भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी एपीएमसी मार्केटची पाहणी केली. यावेळी व्यापारी, माथाडी कामगारांशी चर्चा केली. पवार यांनी बाजार समिती प्रशासन व संचालक मंडळाच्या कारभाराचा निषेध नोंदवला. व्यापाऱ्यांना सोयी सुविधा देणे गरजेचे आहे. मात्र तक्रार करणाऱ्या व्यापाऱ्यांना संचालक मंडळ वेठीस धरतेय. मुस्लिम व्यापाऱ्यांना बांगलादेशी व्यापारी म्हणून हिणवतंय हे अत्यंत निषेधार्थ आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत जरी शिवसेना भाजपची सत्ता असले तरी निवडून येणाऱ्या संचालक मंडळाला सोयी सुविधा देणे त्यांचे काम आहे. मात्र ते देऊ शकत नसतील तर हे संचालक मंडळ बरखास्त करा अशी मागणी सहकार मंत्र्यांकडे करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
आणखी बातम्या
केडीएमसी निवडणुकीत दिसणार नविन राजकीय चित्र..?
फिरत्या ट्रॅफिक सिग्नलचा अनोखा प्रयोग!
गीतकार जावेद अख्तर यांना नामदेव ढसाळ समष्टी पुरस्कार जाहीर