कल्याण
महाराष्ट्र लंगडी असोसिएशनच्या माध्यमातून शहापूर तालुक्यातील आत्मा मालिक शैक्षणिक संकुलात राज्यस्तरीय लंगडी स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या स्पर्धेत १४ वर्षाखालील मुले व मुली आणि खुल्या गटातील महिला व पुरुष अशा ४ संघाने कल्याण डोंबिवली महानगरपालिका लंगडी असोसिएशनचे प्रतिनिधित्व केले होते. दोन दिवस चाललेल्या स्पर्धेत कल्याण डोंबिवलीच्या १४ वर्षाखालील मुलांच्या संघाने विजेतेपद पटकावले तर मुलींच्या संघाने तृतीय स्थानावर मजल मारली. तसेच खुला गट महिला व पुरूष या दोन्ही संघाने चतुर्थ स्थान पटकावले.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका लंगडी असोसिएशनचे अध्यक्ष संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेला असोसिएशनचे उपाध्यक्ष दशरथ आगवणे, जेसीएस मराठी हायस्कूलचे मुख्याध्यापक गणेश कोळेकर, सिध्दार्थ विद्या मंदिरचे रामदास बिन्नर यांनी सदिच्छा भेट दिली. या स्पर्धेत व्यवस्थापक म्हणून असोसिएशनचे कार्याध्यक्ष अविनाश नलावडे, सुप्रिया नायकर, विवेक गुंजेगावकर, प्रविण खाडे यांनी काम पाहिले. तर प्रशिक्षक म्हणून शुभदा देसाई, निता जाधव, जयेश पावशे, सुभाष गायकवाड यांनी जबाबदारी पार पाडली. असोसिएशनच्या माध्यमातून पंच म्हणून मिलिंद धंबा व केवणे यांनी काम पाहिले.
या स्पर्धेतून दिल्ली येथे होणा-या राष्ट्रीय स्पर्धेसाठी चार गटातून १३ खेळाडूंची निवड झालेली आहे. १४ वर्षाखालील मुलांच्या राष्ट्रीय संघात सार्थक कदम, प्रतिक निकम, प्रणय मढवी, भाविक म्हात्रे, १४ वर्षाखालील मुलींच्या संघात रिया उपाध्याय, रिया म्हात्रे, रेशम भोईर खुल्या गटातील पुरूषांच्या (मुले) संघात गौरव पाटील, अमित पवार, आदित्य निकम आणि खुल्या गटातील महिलांच्या (मुली) संघात साक्षी बोरसे, पूर्वा पाटील व भाविका दुधकर या खेळाडूंची निवड झालेली आहे.
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
टिटवाळा परिसराचा सर्वांगीण विकास, हाच आपला ध्यास