April 19, 2025

news on web

the news on web in leading news website

Kalyan APMC मार्केटमध्ये किरकोळ ग्राहकांना नो एन्ट्री

वाढत्या कोरोना रूग्णांमुळे केडीएमसी आयुक्तांचा निर्णय

कल्याण

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किरकोळ ग्राहकांना प्रवेश बंदी करण्यात आली असून घाऊक व्यापारी आणि त्यांचे कर्मचारी यांचे लसीचे दोन डोस झालेले असणे बंधनकारक असल्याचे केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

संग्रहित छायाचित्र

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खरेदीदार देखील जात असतात. त्यामुळे पहाटेच्या वेळेला मोठी गर्दी पाहायला मिळते. यासाठी बाजार समितीला किरकोळ ग्राहकाला परवानगी देऊ नये, घाऊक व्यापारी आहेत त्यांचे कर्मचारी आहेत त्यांनी सुद्धा लस घेतली असेल त्यांनाच परवानगी द्यावी. बाजार समितीमध्ये गर्दी होणार नाही यासाठी इतर जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांची संख्या नियंत्रित करण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या आहेत. लक्ष्मी मार्केटमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसते. तिथे देखील एक दिवसाआड ओटे सुरु ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पालिका क्षेत्रातील आठवडी बाजार पुढील आदेश येईपर्यंत बंद असणार आहेत.

मोठ्या गृहसंकुलांमध्ये २५ टक्के सदनिकामधील रहिवासी पॉझिटिव आले तर त्या गृहसंकुलातील सर्वांची कोरोना चाचणी करण्याच्या सूचना पालिकेच्यावतीने देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे घरकाम करणारे किंवा अजून काही नोकरचाकर असतील त्यांचे लसीचे दोन्ही डोस झालेले असणे बंधनकारक असणार आहे. संसर्ग असलेल्या घरांमध्ये कोणालाही परवानगी देऊ नये ही सर्व जबाबदारी त्या हाउसिंग सोसायटीची असणार आहे. या नियमांचे उल्लघन करणाऱ्या गृहसंकुलाला पहिल्यांदा ५ हजारांचा दंड असून दुसऱ्या वेळी देखील नियम मोडल्यास त्या गृहसंकुलाला १० हजारांचा दंड करण्यात येणार आहे.

वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता जेवढ्या खाटा लागतात त्याच्यापेक्षाही जास्त व्यवस्था केलेली आहे. आपल्याकडे ९ हजार ६५५ खाटा असून त्यामध्ये २ हजार ९९५ ऑक्सिजनचे बेड असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.