केंद्रीय मंत्री रामदास आठवले, आमदार विश्वनाथ भोईर
यांची प्रमुख उपस्थिती
कल्याण
भारतीय संविधानाच्या 75 व्या म्हणजेच अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कल्याणात संविधान अमृत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. युनायटेड बुद्धिस्ट अँड आंबेडकराईट फाऊंडेशनतर्फे आयोजित या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ भोईर, ज्येष्ठ विचारवंत किरण सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
जगभरामध्ये भारतीय संविधान आणि त्याचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अभ्यास केला जातो. जगातील सर्वात मोठी यशस्वी लोकशाही व्यवस्था उभारण्याचे काम या संविधानामुळे झाले आहे. तसेच देशातील सामान्य नागरिकांपासून ते सर्वोच्च व्यक्तीला या संविधानाने समान अधिकार बहाल केल्याचे गौरवोद्गार यावेळी प्रमुख पाहुण्यांकडून काढण्यात आले. तर या संविधानामुळेच आपण आमदार झालो, या संविधानामुळे आपण एवढ्या पुढे गेल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी सांगितले.
तर या कार्यक्रमाला उपस्थित प्रत्येक व्यक्तीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाची एक प्रत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आली. तर माता रमाबाई आंबेडकर यांच्या पहिल्या वहिल्या भव्य पूतळ्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल युनायटेड बुद्धिस्ट अँड आंबेडकराईट फाऊंडेशनकडून आमदार विश्वनाथ भोईर यांचे मनापासून आभार मानण्यात आले.
यावेळी शहरप्रमुख रवी पाटील, रिपाईचे ज्येष्ठ नेते अण्णा रोकडे, भीमराव डोळस, बाळाराम जाधव, प्रदीप जगताप, अजय सावंत यांच्यासह बुद्धिस्ट अँड आंबेडकराईट फाऊंडेशनचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते.
आणखी बातम्या
‘दि वात्सल्य फाऊंडेशन’चा ‘स्नेहमिलन’ सोहळा साजरा
कल्याणमध्ये फुल मॅरेथॉन संपन्न
पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ ॲक्टिव्ह