April 16, 2025

news on web

the news on web in leading news website

‘आपले सरकार पोर्टल’वरील २ हजार ३०१ तक्रारी निकाली

ठाणे

राज्य सरकारने सुरु केलेल्या आपले सरकार २.० वरील तक्रारी निकाली काढण्यासाठी जिल्हा परिषद, ठाणे सामान्य प्रशासन विभागाकडून विशेष मोहीम राबवण्यात आले आहे. जिल्हा परिषदेस १९ सप्टेंबर, २०२३ रोजी पासून आपले सरकार पोर्टलवर २ हजार ३२६ तक्रारी प्राप्त झाल्या असून  २ हजार ३०१ तक्रारी निकाली काढल्या आहे तर फक्त २५ तक्रारी पुढील कार्यवाहीसाठी क्षेत्रीय स्तरावर विस्तृत अहवाल मागणीसाठी प्रलंबित आहेत. या पोर्टलद्वारे ग्रामस्थांना आपल्या तक्रारी ऑनलाइन दाखल करणे तसेच त्याची सद्यस्थिती जाणून घेण्याची सुविधा उपलब्ध असून ९९ टक्के तक्रारी निकाली काढण्यात यश मिळवले आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने जिल्हा परिषदेकडे येणाऱ्या तक्रारी २१ दिवसांच्या आत निकाली काढण्यासाठी सर्व विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

आपले सरकार पोर्टलवरील प्राप्त तक्रारींचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक सोमवारी साप्ताहिक सखोल आढावा घेण्यात येतो. तक्रारदाराची तक्रार मांडणी व्यवस्थित न झाल्यास किंवा म्हणणे न समजल्यास तक्रारदारास दूरध्वनीवर तात्काळ संपर्क केला जातो. तक्रारींचे निवारण ठाणे जिल्हा परिषदेकडून उत्तमप्रकारे होत असल्याबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अविनाश फडतरे यांनी दिली.

केंद्र शासनाच्या प्रशासकीय सुधार विभागामार्फत सुशासन सप्ताह अंतर्गत “प्रशासन गाव की ओर” हे अभियान जिल्ह्यात १९ ते २४ डिसेंबर, २०२४ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत आपले सरकार पोर्टलवरील तक्रारी निकाली काढण्यासाठी देखील यशस्वीरित्या प्रयत्न करण्यात येणार आहे.