कल्याण पूर्वेत दारू मुक्ती शिबिर संपन्न
कल्याण
दारूमुक्त घर आणि दारूमुक्त कल्याण पूर्व घडवण्यासाठी सहयोग सामाजिक संस्था आणि निलेश शिंदे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “भव्य दारूमुक्ती शिबिर” यशस्वीपणे पार पडले. या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना व्यसनमुक्त जीवनाचा नवा मार्ग दाखवण्यात आला. 103 लोकांनी दारू सोडण्याचे औषध घेतले, सदर औषधाचे संपूर्ण खर्च सहयोग संस्था व निलेश शिंदे फाऊंडेशन यांनी केला.
कार्यक्रमात समीर वानखेडे (IRS) यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली. त्यांनी अमली पदार्थ आणि दारूच्या व्यसनामुळे होणारे दुष्परिणाम, त्याचा देशाच्या विकासावर होणारा परिणाम आणि युवा पिढीवर होणाऱ्या प्रभावावर विस्तृत मार्गदर्शन केले.
आमदार सुलभा गायकवाड यांनी सुद्धा उपस्थितांना अंमली पदार्थ शरीरा करीता किती हानिकारक आहे, हे पटवून दिले. निलेश शिंदे यांनी दारू व गांज्या याचे तरुणांना आकर्षण वाटत आहे, पण त्याचे दुष्परिणाम किती भयानक आहे. त्यामुळे माणूस स्वतःचा तसेच कुटुंबाचा कसा नाश करतो, हे समजावून सांगितले.
डॉ. कृष्णा भावले, ज्यांनी एक लाखाहून अधिक रुग्णांना व्यसनमुक्त करण्याचा अनुभव मिळवला आहे, त्यांनी व्यसनमुक्तीच्या प्रक्रियेवर सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या अनुभवांमुळे उपस्थितांना नव्या आशेचा किरण मिळाला.
यावेळी, जगन्नाथजी आप्पासाहेब शिंदे (माजी आमदार, विधान परिषद) तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनीही शिबिरात सहभाग घेतला आणि आपले विचार मांडले.
सहयोग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोसले यांनी या शिबिराच्या आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला, आणि अनेक कुटुंबांना दारू मुक्त जीवनाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा मिळाली.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ कल्याण टायगरचे अध्यक्ष सिद्धेश देवळेकर, सेक्रेटरी प्रेम मुरारी तसेच ज्ञानेश्वर माऊली ग्रंथालयाचे तानाजी सहाने, मातोश्री रखमाबाई शाळेचे संस्थापक दत्तात्रय दळवी,सम्राट अशोक हायस्कूलचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील, माजी परिवहन सभापती सुभाष म्हस्के, सुनील सहाणे, तुळशीराम पोळ, अंबरनाथचे नगरसेवक सुभाष साळुंखे, वंदना मोरे, वर्षा कळके, कवयित्री सुरेखा गावंडे,समाज सेवक कालिदास कदम, जाणीव संस्थेचे प्रथमेश सावंत, संदीप तांबे, शाखा प्रमुख सुरेश काळे, राजु बोर्ड, विरेश कुमार सक्सेना, हॅलो प्रवासीचे संदीप पवार असे अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन स्टडी वेव्ह संस्थेचे अध्यक्ष उमाकांत चौधरी यांनी केले.
दारूमुक्त आयुष्य म्हणजे आरोग्यदायी आणि सुखी जीवनाचा मार्ग. कल्याण पूर्वला दारूमुक्त बनवण्यासाठी असा सामूहिक सहभाग गरजेचा आहे. समाजातील प्रत्येकाने या मोहिमेत सहभागी होऊन आपले योगदान दिल्यास हा प्रयत्न आणखी प्रभावी होईल असे मत विजय भोसले यांनी व्यक्त केले.
आणखी बातम्या
गीतकार जावेद अख्तर यांना नामदेव ढसाळ समष्टी पुरस्कार जाहीर
सातरस्ता येथे निरंकारी भक्तांचे रक्तदान
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता