April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

फिरत्या ट्रॅफिक सिग्नलचा अनोखा प्रयोग!

महिन्याभराच्या अभ्यासानंतर बसवण्यात येणार कायमस्वरूपी सिग्नल यंत्रणा!

कल्याण (सोनल सावंत-पवार)

कल्याण डोंबिवलीतील वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन त्यावर मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून कल्याण पश्चिम येथील सर्वात वर्दळीच्या सहजानंद चौकामध्ये महापालिका आणि वाहतूक पोलीस प्रशासनातर्फे फिरत्या ट्रॅफिक सिग्नलचा अनोखा प्रयोग करण्यात येत आहे.

सहजानंद चौकात असलेल्या ५ रस्त्यांचा विचार करता याठिकाणी “सोलर बेस पोर्टेबल स्टँड अलोन सिग्नल यंत्रणा” प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. पुढील महिनाभर ही सिग्नल यंत्रणा कार्यान्वित ठेवून त्यातून येणाऱ्या निष्कर्षानंतर अभ्यास करून महापालिकेतर्फे याठिकाणी कायमस्वरूपी सिग्नल यंत्रणा बसविण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली.

कल्याण पश्चिमेतील आग्रा रोड हा प्रमुख मार्ग असून दररोज याठिकाणाहून हजारो वाहनांची वर्दळ सुरू असते. या मार्गावरील दुर्गाडी चौक, लालचौकी, सहजानंद चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बैल बाजार या प्रमुख चौकात वाहतूक नियंत्रणाचे काम मोठे जिकिरीचे आहे.

 

या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सहजानंद चौकात कायमस्वरूपी सिग्नल यंत्रणा उभारण्यात येणार आहे. मात्र इथल्या वाहतुकीचा, वर्दळीचा आणि वाहनांच्या संख्येचा अभ्यास न करता ही सिग्नल यंत्रणा बसवली गेल्यास पालिकेचा पैसा वाया जाऊ शकतो. शहरातील नागरिकांच्या कराचा हा पैसा विचारात घेऊन कायमस्वरूपी सिग्नल यंत्रणा बसविण्यापूर्वी त्याचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने ही सोलर बेस पोर्टेबल स्टँड अलोन सिग्नल यंत्रणा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. पुढील 1 महिनाभर त्याद्वारे इथल्या वाहतुकीचा अभ्यास करण्याबरोबरच त्यासोबतच कोणते रस्ते वन वे करणे, कोणता डिव्हायडर मागे घेणे, कोणता हायमास्ट शिफ्ट करणे आदी बाबींचा विचारही केला जाणार आहे आणि मग त्यानंतर या चौकाच्या आणि इथल्या वाहतुकीच्या अनुषंगाने कायमस्वरुपी सिग्नल यंत्रणा बसविण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली आहे.