April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

केडीएमसी निवडणुकीत दिसणार नविन राजकीय चित्र..?

भिवंडी लोकसभेत नव्या राजकीय समीकरणाची नांदी; नीलेश सांबरे आणि साईनाथ तारे यांची वाढती जवळीक

कल्याण

ठाणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचा मतदारसंघ असलेल्या भिवंडी लोकसभेत नव्या राजकीय समीकरणाची नांदी होताना दिसत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख साईनाथ तारे आणि जिजाऊ सामाजिक संस्थेचे प्रमुख निलेश सांबरे यांच्या वाढत्या भेटीगाठी मोठ्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साईनाथ तारे आणि निलेश सांबरे यांच्यातील ही जवळीक नव्या राजकीय बंधनाचे द्योतक असल्याचे बोलले जात आहे.

भिवंडी लोकसभेतील राजकीय परिस्थितीचा विचार करता गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत निलेश सांबरे यांनी अपक्ष निवडणूक लढवली असतानाही तब्बल अडीच लाखांच्या आसपास मते घेतली होती. तर साईनाथ तारे हेज्या पक्षाचे नेतृत्व करत आहेत त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची भिवंडी लोकसभा मतदारसंघात सुमारे ३ ते ३.५ लाख मते आहेत. साईनाथ तारे आणि निलेश सांबरे हे एकत्र आले तर आगामी निवडणुकीत मतांचा हा आकडा 6 लाखांचा टप्पा पार करू शकतो.

आणखी खोलात जाऊन राजकीय समीकरणाचा विचार केल्यास निलेश सांबरे हे कुणबी समाजाचे आहेत. तर साईनाथ तारे हे आगरी समाजाचे असून तारे ह्यांचे आगरी, कोळी , कुणबी, आदिवासीं,खानदेशी, मुस्लिम, बहुजन अशा सर्व समाजांत एक वेगळे स्थान आहे. त्यासोबतच ठाणे जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांशी तारे यांचे घरोब्याचे संबंध आहेत. एक मितभाषी, अजातशत्रू व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. तर निलेश सांबरे यांनाही कुणबी, आदिवासीं आणि बहुजन समाजामध्ये मानाचे स्थान असून आपल्या सामाजिक उपक्रमांमुळे हा समाजही त्यांच्याशी चांगला जोडला गेला आहे. सांबरे यांनी जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत ठाणे, पालघर, रत्नागिरी अशा विविध जिल्ह्यांत समाजातील सर्व घटकांसाठी वैद्यकीय, शैक्षणिक, रोजगार, व्यवसाय सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. इतकेच नाही तर महिलांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी लघू उद्योग प्रशिक्षण आणि रोजगार निर्मितीसाठीही जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून मोठी मदत केली आहे.

त्यातच गेल्या काही दिवसांपासून निलेश सांबरे आणि साईनाथ तारे यांच्यात वाढलेल्या भेटीगाठींनी अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या दोन्ही नेत्यांचे असणारे राजकीय स्थान, सामाजिक ताकद आणि पाठशी असणारी मतांची आकडेवारी पाहता या दोन नेत्यांच्या एकत्र येण्यामुळे भिवंडी लोकसभेतील एका नव्या राजकीय समीकरणाची नांदी होताना दिसत आहे. ज्या बदलांचे संकेत या नेत्यांच्या सततच्या गाठीभेटीतून स्पष्टपणे जाणवत आहेत. त्यांची ही राजकीय जवळीक आणखी कुठपर्यंत जाते हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.