ठाणे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
शहापूर
ठाणे जिल्ह्यातील शहापूरमधील एका छोट्याशा गावातील शेतकऱ्याची लेक सुजाता रामचंद्र मडके हिने भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे, इस्रो (ISRO) मध्ये सायंटिस्ट अशी गरुडझेप घेतली आहे.
ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील शिरगांव या लहानशा खेडेगावात सुजाताचा जन्म झाला. हे गाव शहापूरपासून १५ किलोमीटर अंतरांवर असून तिचे प्राथमिक शिक्षण याच गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. विशेष म्हणजे ही शाळा १९३६ साली स्थापन झाली असून याच शाळेत सुजाताचे आजोबा जिवा, वडील रामचंद्र यांचेही शिक्षण झाले. त्यानंतर वडिलांनी ठाणे जिल्हा परिषदेमध्ये लिपिक म्हणून नोकरी करत आपला शेती व्यवसाय संभाळत त्यातून मिळलेल्या आर्थिक उत्पन्नातुन तीन मुली एक मुलगा अशा चौघांचे उच्च शिक्षण पूर्ण केले.
सुजाताच्या दोन्ही बहिणी आणि एक भाऊ मोठ्या कंपनीत नोकरी करीत आहे. तर दुसरीकडे लहानशा गावातील सुजाताची ही गरुडझेप ठाणे जिल्ह्यात कौतुकाचा विषय बनला आहे. सुजाताच्या संशोधनातून ठाणे जिल्ह्याचा झेंडा आता इस्रोमध्ये झळकणार आहे. विशेष म्हणजे दोन वर्ष प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे येथील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदावर काम केल्यानंतर सुजाता भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) बेंगलुर (कर्नाटक) येथे शास्रज्ञ (राजपत्रित अधिकारी) या पदावर सुजाता २७ मे रोजी रुजू झाली आहे.
माझी मुलगी सुजाता महाराष्ट्र सोडून पहिल्यांदा हैद्राबाद येथे शिक्षणसासाठी बाहेर गेली होती. तिच्या अभ्यासाची मेहनत पाहता आरटीओमध्ये नोकरी करत असतानाच इस्रोच्या अभ्यासक्रमासाठी तिने रात्रंदिवस मेहनत घेतली. आजही अभ्यासासाठी घेतलेली तब्बल दोन पोती पुस्तकं घरात जपून ठेवली आहे. विशेष म्हणजे माझ्या मुलीच्या हातून देशसेवा करण्याची संधी मिळाली याचा मला सार्थ अभिमान आहे.
रामचंद्र मडके, सुजातचे वडील
आणखी बातम्या
आधारवाडी कारागृहात ‘दिवाळी पहाट’
रेनी कार्निवल संवाद तरुणाईचा २०२५
कल्याणात रोटरी क्लबचा ‘अमृत जल’ उपक्रम