डोंबिवली
हॉटेल मॅनेजर असूनही लवकर पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांना टार्गेट करून त्यांच्याकडील सोनसाखळ्या हिसकावणाऱ्या चोराला डोंबिवली रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. परेश किशोर घावरी (३५, रा. कामगार वसाहत, कल्याण पश्चिम) असे अटकेतील आरोपीचे नाव असून, त्याच्या ताब्यातून तब्बल ५.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
चोरीसाठी आरोपी मोटारसायकल व स्कूटरवरून येत असे आणि ‘धूम स्टाईल’ने सोनसाखळी हिसकावून फरार होत असे. २३ जून व ९ जुलै रोजी डोंबिवलीच्या ९० फुट रोड परिसरात झालेल्या दोन चोरीच्या घटनांप्रकरणी पोलिसांनी १७२ सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपीला अटक केली. उल्हासनगरमध्ये त्याने तिसरी चोरी केल्याची कबुली दिली आहे.
डोंबिवली पोलिसांनी त्याच्याकडून –
१,८०,००० रु. किमतीची २० ग्रॅम सोनसाखळी
९०,००० रु. किमतीची १० ग्रॅम सोनसाखळी
१,१५,००० रु. किमतीची मोटारसायकल
१,७०,००० रु. किमतीची स्कूटर
असा एकूण ५,५५,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या कारवाईत पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहायक आयुक्त सुहास हेमाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, तसेच तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांचे मोठे योगदान आहे.
सहकारी आरोपी अद्याप फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. पुढील तपास डोंबिवली पोलीस ठाण्याचे तपास पथक करत आहे.
आणखी बातम्या
आधारवाडी कारागृहात ‘दिवाळी पहाट’
अंबरनाथमध्ये विकासकामांना गती : खा. शिंदे यांचा आढावा
समाज जागृतीत योगदानासाठी स्टडी व्हेवजला पुरस्कार