April 19, 2025

news on web

the news on web in leading news website

KDMC च्या निषेधार्थ उपोषणकर्त्यांनी केले मुंडन

रिंग रोड प्रकल्पातील ८४० जणांच्या पुनर्वसनाची मागणी

कल्याण

KDMC च्या रिंग रोड प्रकल्पात ८४० जणांची घरे बाधित झाली आहेत. या बाधितांचे पुनर्वसन करण्यात यावे या मागणीसाठी बाधितांचे गेल्या दहा दिवसापासून ‘अ प्रभाग क्षेत्र’ कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरु आहे. प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नसल्याने आज महापालिका प्रशासनाच्या निषेधार्थ उपोषणकर्त्यांनी मुंडन करुन प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त केला.

कल्याण डोंबिवली महापालिकेचा रिंग रोड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा प्रकल्प सात टप्प्यातील आहे. त्यापैकी दुर्गाडी ते टिटवाळा या १७ किलोमीटर टप्प्यातील ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. या टप्प्यातील अटाळी आंबिवली दरम्यान ८४० जणांची घरे बाधित झाली होती. बाधितांनी यापूर्वी प्रशासनाकडे वारंवार पुनर्वसनासाठी पाठपुरावा केला. तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही दाद मागितली. मात्र त्यांचा प्रश्न सुटला नाही. अखेरीस पुनर्वसनाच्या मागणीसाठी बाधितांनी १० जानेवारीपासून बेमुदत साखळी उपोषण सुरु केले. त्यांच्या उपोषणाची दखल प्रशासनाने अद्याप घेतली नाही. १० दिवस साखळी उपोषण सुरु असताना प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने अखेर आज उपोषणकर्त्यांनी मुंडन करुन प्रशासनाचा निषेध केला आहे.