April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

Republic Day : प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्या सकाळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम

साकेत मैदानावर ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम

ठाणे

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्या बुधवार, २६ जानेवारी रोजी येथील साकेत मैदानावरील पोलिस क्रिडा संकुलात ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम होणार आहे. सकाळी ९.१५ वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कळविले आहे.

कोरोनामुळे निधन झालेल्या ठाणे पोलिस आयुक्तालयातील दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपातत्वारील नियुक्तीपत्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी वाटप करण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बॅजेसचे वितरण करण्यात येणार आहे.

तत्पूर्वी सकाळी सव्वा आठला जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम होईल. जिल्हा प्रशासनातर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या कार्यक्रमाची तयारी सुरू असून आज सकाळी त्याची रंगीत तालीम करण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या प्रांगणात ध्वजारोहण

ठाणे जिल्हा परिषदेच्यावतीने भारतीय प्रजासत्ताकाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार, २६ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता, जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या प्रांगणात राष्ट्रध्वजारोहण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपाध्यक्ष सुभाष पवार उपस्थित राहणार आहेत. कोविड१९ ची नियंत्रण नियमावलीचे काटेकोरपणे पालन करून कार्यक्रम संपन्न होईल.