कल्याण
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सार्वजनिक वाचनालय, कल्याण यांनी शालेय विद्यार्थांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ऑनलाइन भावगीत, भक्तीगीत व देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन केले होते. या गायन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच वाचनालयाच्या सभागृहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून व्यावसायिक भास्कर शेट्टी, वाचनालयाचे उपाध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, सरचिटणीस भिकू बारस्कर चिटणीस माधव डोळे उपस्थित होते.

कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रात आल्यानंतर या मराठी लोकांनी माझे साम्राज्य उभारण्यासाठी मोलाची साथ दिल्याचे मनोगत भास्कर शेट्टी यांनी व्यक्त केले. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी अनेक बाळगोपाळांनी एकत्र येऊन हा दिवस मोठ्या अभिमानाने साजरा केल्याचा आनंद वाचनालयाचे चिटणीस डोळे यांनी व्यक्त केला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव प्रसंगी आपण सर्व नागरिकांनी वाचन संस्कृती वृद्धींगत करावी असा मोलाचा सल्ला उपाध्यक्ष कुलकर्णी यांनी दिला. शालेय विद्यार्थ्यांची वाचनाशी सांगड घालण्याची तसेच या गायन स्पर्धेत सहभाग घेऊन वाचनालयाला भेट देण्याच्या अनोख्या कल्पनेला कल्याणकरांनी उस्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल स्पर्धकांचे आभार वाचनालयाचे सरचिटणीस बारस्कर यांनी मांडले.

कार्यक्रम प्रसंगी वाचनालयाच्या कार्यकारिणी सदस्या व ग्रंथसेविकांनी तसेच स्पर्धकांनी देशभक्तीपर गीते सादर केली. या गायन स्पर्धेतील भैरवी कराळे, श्रीनी बद्दलवार, अवधूत मतकरी, ऋषभ जाधव, कृष्णा बच्छाव, निधी वासनकर, हर्षदा मनोरे, नारायणी आपटे, नीलाक्षी जानवे, अनुष्का गांगल, तृप्ती पार्टे या विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. वाचनालयाच्या आशा जोशी, कार्यकारिणी सदस्या नीलिमा नरेगलकर, परिघा विधाते, कार्यकारिणी सदस्य अरविंद शिंपी, वाचनालयाच्या ग्रंथपाल गौरी देवळे, ग्रंथसेविका वाचनालयातील वाचक प्रेक्षक वर्ग उपस्थित असल्याची माहिती वाचनालयाचे सरचिटणीस बारस्कर यांनी दिली.
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू