April 19, 2025

news on web

the news on web in leading news website

गोपीनाथ मुंडे यांनी वंजारी समाजासाठी दिलेले योगदान न विसरण्यासारखे : प्रमोद हिंदुराव

कल्याण

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी वंजारी समाजासाठी दिलेले योगदान न विसरण्यासारखे असल्याचे मत सिडकोचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदुराव यांनी येथे व्यक्त केले.

अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती या सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थेच्या ३४ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात वंजारी भवन कल्याण येथे प्रमुख पाहुणे म्हणून हिंदुराव उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, गोपीनाथ मुंडे हे कोणत्या पक्षाचे होते हे महत्त्वाचे नसून त्यांनी पक्षभेद न करता इतर समाजासाठी जे भरीव कार्य केले आहे. विशेषतः वंजारी समाजाच्या विकासासाठी त्यांनी फार मोठे योगदान दिले आहे. हे आपल्याला विसरता येणार नाही आणि म्हणूनच ते खऱ्या अर्थाने लोकनेते होते.

हिंदुराव यांनी यावेळी वंजारी समाजाच्या समाज मंदिरासाठी ११ लाख रुपये देणगी देणार असल्याचे जाहीर केले. या कार्यक्रमाकरिता व्यापारी असोसिएशनचे विजय पंडित हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. पंडित यांनी आपल्या भाषणात सांगितले की, वंजारी समाज एक कष्टकरी समाज आहे. या समाजाची आणि माझे वय ४० वर्षे पासूनचे ऋणानुबंध असून मी नेहमीच वंजारी समाजाच्या पाठीशी उभा राहिलो आहे. यापुढेही कोणत्याही मदतीकरिता मी नेहमी सदैव तयार आहे असे सांगितले.

वर्धापन दिन कार्यक्रमात पाहुण्यांच्या हस्ते बांधीलकी वधू वर सूचक मंडळाच्या वतीने वधू वर सूचक मेळावा यशस्वी आयोजित केल्याबद्दल व ८१ विवाह जमविल्या बद्दल शाखा अध्यक्ष निवृत्ती घुगे तसेच महिलांसाठी बचत गट स्थापन करून त्यांना आर्थिक स्थैर्य देण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला शाखा अध्यक्ष लता पालवे आणि युवकांना नोकरीबाबत मार्गदर्शन व्हावे म्हणून पोलीस भरती मार्गदर्शन शिबीरसारखे विविध उपक्रम राबविणारे युवा शाखा अध्यक्ष एडवोकेट संग्राम घुगे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच कल्याण ते नाशिक रोड लोकल सुरू करण्यात सिंहाचा वाटा असणारे वामन सांगळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष शंकरराव आव्हाड यांनी केले. तर संस्थेचा परिचय देऊन गेले ३४ वर्षातील संस्थेच्या कार्याचा आढावा सरचिटणीस अर्जुन डोमडे यांनी सांगितला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वंदना सानप यांनी केले तर सूत्रसंचालन सिमरन दराडे हिने केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामनाथ दौंड, आत्माराम सर, वसंत आव्हाड, निवृत्ती घुगे, संतोष आव्हाड, मनीषा घुगे, लता पालवे, चंद्रकला दराडे यांनी विशेष परिश्रम घेतले.