The Web Cloud Media

the news on web in leading news website in maharashtra

डिजिटल युगात सतर्क राहणे आवश्यक

पोलीस उपायुक्त अतुल झेंडे

प्रेस क्लब कल्याणच्या वतीने वार्तालाप संपन्न

कल्याण

सध्याच्या डिजिटल युगात फसवणूक करणारे तंत्रज्ञान वाढत असून यामुळे अनेकांना मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. यातून वाचण्यासाठी नागरिकांनी देखील सतर्क राहणे आवश्यक आहे. मोबाईलवर येणाऱ्या अनोळखी व्यक्तीकडून पाठवण्यात आलेले मॅसेज अथवा कॉलद्वारे दाखविण्यात येणाऱ्या प्रलोभनाला बळी पडू नये असे आवाहन कल्याण परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी येथे व्यक्त केले.

प्रेस क्लब, कल्याण यांच्यावतीने अतुल झेंडे यांचा वार्तालाप शनिवारी आचार्य अत्रे कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी, व्यासपीठावर पोलीस निरीक्षक बाळासाहेब उघडे, प्रेस क्लब, कल्याणचे अध्यक्ष आनंद मोरे, कार्याध्यक्ष कुणाल म्हात्रे, सचिव विष्णुकुमार चौधरी, ज्येष्ठ पत्रकार रमेश दुधाळकर आणि विनायक बेटावदकर उपस्थित होते. दरम्यान, प्रेस क्लब, कल्याण रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असून, या वर्षात विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याचे अध्यक्ष आनंद मोरे यांनी सांगितले. यावेळी क्लबच्या नवीन लोगोचे अनावरण अतुल झेंडे यांच्या हस्ते करण्यात आले.

अमलीपदार्थ बाळगणाऱ्यावर मागील काही महिन्यांपासून कारवाई करण्यात येत असून शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ड्रग्स तसेच अन्य अमलीपदार्थांबाबत शाळांमध्ये पोलीस दादा आणि पोलीस दिदिंमार्फात वेळोवेळी मार्गदर्शन शिबीर राबविण्यात येते. कल्याण डोंबिवली शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांच्या मदतीला पोलीस मित्र देखील असतात. त्यांच्यामार्फत गुन्हेगारी रोखणे तसेच शहरात सुव्यवस्था राखणे सुलभ होत असल्याचे झेंडे यांनी यावेळी सांगितले.

‘डायल ११२’ वर संपर्क करणाऱ्यांच्या मदतीसाठी कल्याण परिमंडळ तीनमधील पोलिसांकडे वाहने असल्याने तक्रार प्राप्त होताच पोलिसांना त्याठिकाणी धाव घेणे शक्य होते. कल्याण परिमंडळ तीनच्या पोलिसांचा रिस्पॉन्स टाईम सात मिनिटांचा आहे.

शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमुळे शहरात घडणाऱ्या गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होत आहे. त्याचबरोबर, शहरातील दुकानदारांनी एक कॅमेरा दुकानाबाहेरील रस्त्याच्या दिशेने लावल्यास एखादी घटना घडल्यास त्या सीसीटीव्हीचा नक्कीच फायदा होऊ शकतो. त्यामुळे, दुकानदारांनी रस्त्याच्या दिशेने एक कॅमेरा लावण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कल्याण डोंबिवली शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता कल्याण पूर्वेत एक आणि काटई नाका येथे एक नवीन पोलीस ठाणे उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याचेही झेंडे यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान या वार्तालापाचे सूत्रसंचालन अशोक कांबळे तर आभार प्रदर्शन दत्ता बाठे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *