ठाणे
ठाणे जिल्ह्यात कर्करोगाचे लवकर निदान करून नागरिकांना त्वरित उपचाराकडे प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेला कर्करोग डायग्नोस्टिक व्हॅन हा उपक्रम जिल्ह्यात अत्यंत यशस्वी ठरत आहे. ३ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत नियोजित तालुक्यांमध्ये फिरत असलेल्या या व्हॅनला स्थानिक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.
हा उपक्रम जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर राबविण्यात येत आहे. कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे वेळेत निदान होणे अत्यंत गरजेचे असल्याने ग्रामीण व शहरी भागातील सर्वसामान्यांना मोफत आणि सुलभ तपासणी उपलब्ध करून देणे हा व्हॅनचा उद्देश आहे.
कर्करोग निदान व्हॅनद्वारे मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, गर्भाशय मुखाचा कर्करोग प्रमुख कर्करोगांची तपासणी केली जात आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी सांगितले की, व्हॅनमध्ये कर्करोग तपासणीसाठी आवश्यक आधुनिक उपकरणे उपलब्ध असून प्रशिक्षित वैद्यकीय टीमद्वारे नियमित तपासणी केली जाते. कर्करोगाचे निदान प्राथमिक अवस्थेत झाल्यास उपचाराने हा आजार पूर्णपणे नियंत्रित व बरा होऊ शकतो.
व्हॅन सध्या नियोजित कार्यक्रमानुसार कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर तालुक्यांमध्ये फिरत आहे. स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालये, वैद्यकीय अधिकारी, आशा सेविका आणि आरोग्य कर्मचारी यांच्या समन्वयातून जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांना तारीख व ठिकाणाची माहिती वेळोवेळी दिली जात असून मोठ्या प्रमाणात लोक सहभाग वाढत आहे.
३ नोव्हेंबरपासून आज अखेर पर्यंत २ हजार ९७५ एकूण व्यक्तींची तपासणी केली असून आढळलेले संशयित व्यक्ती २८ आहेत. तपासणीत आढळलेल्या संशयित रुग्णांना पुढील तपासणी व योग्य उपचारासाठी संबंधित वैद्यकीय संस्थेकडे तात्काळ पाठविण्यात आले आहे.
“कर्करोगाचे वेळीच निदान झाले तर उपचार पूर्णपणे यशस्वी होतात. त्यामुळे नागरिकांनी या मोफत तपासणी उपक्रमाचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा,” असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.













Leave a Reply