बेलापूर
बेलापूरमध्ये तीन दिवस रंगलेल्या ब्रह्मऋषि व्यासदेवजी मेमोरियल क्रिकेट टूर्नामेंटने केवळ क्रिकेटचा नाही, तर एकात्मता आणि बंधुत्वाचा देखील शानदार नमुना सादर केला. संत निरंकारी मिशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या रौप्य महोत्सवी स्पर्धेचे आयोजन 17 ते 19 एप्रिल दरम्यान भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी क्रीडा संकुल, सीबीडी-बेलापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
स्पर्धेदरम्यान एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. मैदानावर चुरशीची लढत, पण मनात मैत्री. हार-जीत बाजूला ठेवून खेळाडूंनी आनंद, बंधुत्व आणि परस्पर आदराची भावना जपली. त्यामुळे ही स्पर्धा केवळ क्रिकेटपुरती मर्यादित न राहता सामाजिक एकतेचा संदेश देणारी ठरली.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध विभागांतून एकूण 21 संघ सहभागी झाले होते. 19 एप्रिल रोजी झालेल्या अंतिम सामन्यात वसई आणि गोवा संघांमध्ये रंगतदार लढत झाली. अखेरीस वसई संघाने बाजी मारत विजेतेपद पटकावले, तर गोवा संघ उपविजेता ठरला.
सायंकाळी झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात संत निरंकारी मिशनचे स्थानिक सेक्टर संयोजक वसंत गौड यांच्या हस्ते विजेत्या आणि उपविजेत्या संघांचा गौरव करण्यात आला. निरंकारी स्पोर्ट्स कमिटी (महाराष्ट्र) तर्फे ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या. वसईच्या गौतम पाटील यांना ‘मॅन ऑफ द सीरीज’चा किताब मिळाला. याशिवाय उत्कृष्ट फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणासाठीही खेळाडूंना सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेचे उद्घाटन 17 एप्रिल रोजी महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक, मिशनचे मेंबर इंचार्ज जोगिंदर मनचंदा, सचिव जोगिंदर सुखिजा यांच्या हस्ते झाले. यावेळी मनमोहन छाब्रा, युवा अंपायर रिक्की कोटो, उद्योगक्षेत्रातील मान्यवर सुनील बराल आणि भरत रावल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.











Leave a Reply