Power by The Web Cloud Media

१७६ कोटींचा व्यवहार, प्रकल्प मात्र बंद !

टायकुन गोल्ड एव्हेन्यू प्रकरणी बिल्डर्सविरोधात गुन्हा

कल्याण

पश्चिमेतील ‘टायकुन गोल्ड एव्हेन्यू’ पुनर्विकास प्रकल्पात १७६ कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या फसवणुकीचा आरोप करण्यात आला असून, याप्रकरणी विकासकांसह संबंधित व्यक्तींविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीकांत दिगंबर शितोळे, चेतन सराफ, महेश गोसावी यांच्यासह इतरांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३(५), ३१६(२) आणि ३१८(४) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

प्रकल्पाचे काम २०२२ पासून बंद असून, सोसायटीची जमीन गहाण ठेवून रहिवासी तसेच फ्लॅटधारकांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम घेऊन त्यांची फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

पुनर्विकासाचे आश्वासन; मात्र घराचा ताबा नाही

कल्याणमधील चिकनघर येथील सर्व्हे क्रमांक २२ मधील म्हाडाच्या एमआयजी योजनेतील शांतीदूत सहकारी गृहनिर्माण संस्था लिमिटेडच्या पुनर्विकासाचे काम टायकुन अवंती प्रोजेक्ट्स एलएलपीकडे देण्यात आले होते. टायकुन रियल्टीज एलएलपी आणि सिकॉम रियल्टी लिमिटेड यांचा हा संयुक्त उपक्रम असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तक्रारीनुसार, नंदा प्रभाकर म्हात्रे यांनी २९ ऑगस्ट २०२१ रोजी प्रकल्पातील ‘ए’ विंगमधील ११व्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ११०१साठी ३९ लाख ३६ हजार ६९ रुपये भरले होते. जुलै २०२५पर्यंत सदनिकेचा ताबा मिळणे अपेक्षित असतानाही तो मिळाला नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

दहाव्या मजल्यापर्यंतच बांधकाम?

विकासकांनी प्रकल्पाचे बांधकाम केवळ दहाव्या मजल्यापर्यंत केले असून त्यानंतर काम अर्धवट राहिल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. २०२२ पासून प्रकल्पाचे काम पूर्णपणे बंद असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

यामुळे मूळ रहिवाशांसह नव्या सदनिका खरेदीदारांसमोर घराचा ताबा मिळण्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

सोसायटीची जमीन बँकेकडे गहाण ठेवल्याचा आरोप

विकासकांना देण्यात आलेल्या कुलमुखत्यारपत्राचा गैरवापर करून सोसायटीची जमीन बँकेकडे गहाण ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या व्यवहारामुळे सोसायटीतील रहिवासी आणि सदनिका खरेदीदार आर्थिक अडचणीत सापडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शांतीदूत सहकारी गृहनिर्माण संस्थेतील १८४ सदस्य तसेच इतर शेकडो फ्लॅट खरेदीदारांकडून मिळून १७६ कोटी रुपयांहून अधिक रक्कम घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

घराचा ताबा, पुनर्विकास आणि आर्थिक व्यवहारासंदर्भात दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात आली नसल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.

पोलीस तपास सुरू

या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक प्रेमनाथ शेटे ढोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

प्रकल्पाशी संबंधित आर्थिक व्यवहार, सोसायटीच्या जमिनीची कागदपत्रे, बँक व्यवहार तसेच सदनिका खरेदीदारांकडून घेण्यात आलेल्या रकमेबाबत तपास केला जाणार आहे. दरम्यान, संबंधित आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी तक्रारदारांकडून करण्यात आली आहे.

टीप : वरील आरोप हे तक्रारदारांनी केलेले असून, त्यांची सत्यता तपासाच्या आणि न्यायालयीन प्रक्रियेच्या अधीन आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *