मुंबईसह महाराष्ट्रातून हजारो भक्तांची उपस्थिती;
सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांचा मानवतेला आध्यात्मिकतेचा संदेश
समालखा
आध्यात्मिक जागृती, मानवता आणि विश्वबंधुत्वाचा संदेश देत ७९व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा भव्य शुभारंभ झाला. २३ ते २६ ऑक्टोबरदरम्यान आयोजित या चार दिवसीय संत समागमाला देश-विदेशासह मुंबई आणि महाराष्ट्रातील हजारो भक्तांनी उपस्थिती लावली आहे.
समागमाच्या पहिल्याच दिवशी सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांनी मानवतेला संदेश देताना, प्रत्येक क्षणी परमात्म्याच्या अस्तित्वाची अनुभूती घेत आध्यात्मिकता जीवनात अंगीकारल्यानेच खरी जागृती निर्माण होते, असे प्रतिपादन केले.
सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमित जी यांच्या पावन सान्निध्यात सुरू झालेल्या या समागमात विविध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तांना सद्गुरूंचे दर्शन तसेच त्यांच्या संदेशांचा लाभ घेता येत आहे.
आध्यात्मिक जागृतीसोबत सामाजिक जबाबदारीचाही संदेश
सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांनी सांगितले की, संत-महात्मे आणि भक्तगण एका ठिकाणी एकत्र येण्यामागील उद्देश केवळ धार्मिक कार्यक्रमापुरता मर्यादित नसून मानवाच्या मनात आध्यात्मिक जागृती कायम ठेवणे हा आहे. जीवनातील प्रत्येक क्षण पूर्ण जाणीव आणि परमात्म्याच्या अनुभूतीसह जगण्याची प्रेरणा यातून मिळते.
घर, कुटुंब, समाज आणि देशाप्रती असलेली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडत प्रत्येकाने जागरूक जागतिक नागरिक बनावे, असे आवाहनही त्यांनी केले. जात, भाषा, प्रदेश किंवा स्वभावातील भेद बाजूला ठेवून प्रत्येक व्यक्तीला प्रेम, सन्मान आणि आपलेपणाने स्वीकारणे हीच खरी मानवता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विचारांपेक्षा आचरणातील आध्यात्मिकता महत्त्वाची
आध्यात्मिक जागृती केवळ विचार किंवा दिखाव्यापुरती मर्यादित नसून ती व्यक्तीच्या वर्तनातून, आचरणातून आणि सामाजिक कर्तव्यांतून दिसून यायला हवी, असा संदेश सद्गुरू माता जी यांनी दिला.
परिस्थिती कोणतीही असो, परमात्म्याची इच्छा स्वीकारून प्रत्येक क्षण आनंद, समाधान आणि कृतज्ञतेने जगण्याची भावना अंगीकारणे हीच खरी आध्यात्मिकता असल्याचे त्यांनी सांगितले.
शोभायात्रा आणि भरतनाट्यमने वेधले लक्ष
समागमस्थळी सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमित जी यांचे भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. त्यानंतर फुलांनी सजविलेल्या खुल्या पालखीतून त्यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
निरंकारी इन्स्टिट्यूट ऑफ म्युझिक अँड आर्ट्सच्या ६०० हून अधिक विद्यार्थ्यांनी भरतनाट्यम आणि स्वागतगीत सादर करत दिव्य युगलाचे स्वागत केले. या सादरीकरणामुळे समागमाच्या आध्यात्मिक वातावरणाला सांस्कृतिक रंगाचीही जोड मिळाली.
विविधतेतून मानव-एकतेचे दर्शन
समागमात विविध संस्कृती, जाती, धर्म आणि भाषांमधील भक्त एकत्र आले आहेत. भेदभावाच्या पलीकडे जाऊन प्रेम, सद्भाव आणि मानव-एकतेच्या भावनेने एकत्र आलेले भक्तांचे दृश्य या समागमाचे विशेष आकर्षण ठरत आहे.
सद्गुरूंच्या प्रेम, सद्भाव आणि विश्वबंधुत्वाच्या संदेशाचे प्रत्यक्ष दर्शन या वातावरणातून घडत असून, आध्यात्मिकतेसोबतच मानवतेचा विचार केंद्रस्थानी ठेवण्याचा संदेश ७९व्या वार्षिक संत समागमातून दिला जात आहे.













Leave a Reply