Power by The Web Cloud Media

ठाणे जिल्ह्यात १०,५७८ बालकांची लॉटरीद्वारे निवड

पालकांनी वेळेत पडताळणी करून प्रवेश निश्चित करावा

प्रवेशासाठी २० एप्रिल २०२६ पर्यंत मुदत

ठाणे, दि. ११ :

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) (क) नुसार स्वयंअर्थसहाय्यित विनाअनुदानित (अल्पसंख्याक शाळा वगळून) शाळांमध्ये प्रवेशस्तर वर्गात २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. वंचित गटातील व दुर्बल घटकातील बालकांना इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत मोफत शिक्षण मिळावे यासाठी राज्य शासनामार्फत दरवर्षी आरटीई अंतर्गत २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते.

सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी ठाणे जिल्ह्यातील पाच तालुके व सहा महानगरपालिका कार्यक्षेत्रातील आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी राज्यस्तरावर लॉटरी प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत (Regular Selection) यादीमध्ये ठाणे जिल्ह्यातील एकूण १०,५७८ अर्जांची निवड करण्यात आली आहे.

निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशासाठी दिनांक २० एप्रिल २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. संबंधित पालकांनी विहित मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह पडताळणी करून आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.

प्रवेश प्रक्रिया

निवड झालेल्या बालकांच्या पालकांनी RTE Portal Maharashtra या संकेतस्थळावर जाऊन पुढील प्रक्रिया पूर्ण करावी :

ऍडमिट कार्ड (Admit Card) प्रिंट काढावी

ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत घ्यावी

हमीपत्र (Undertaking) प्रिंट काढावी

अर्ज भरताना अपलोड केलेल्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती सोबत घ्याव्यात

वरील कागदपत्रांसह संबंधित तालुका/महानगरपालिकेच्या पडताळणी केंद्रावर जाऊन पडताळणी समितीकडून प्रवेश निश्चित करून घ्यावा. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर प्रवेश निश्चित झाल्याची पावती घेणे आवश्यक आहे. त्यानंतर संबंधित शाळेत कागदपत्रे जमा करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी.

– पालकांना अर्ज करताना नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर SMS द्वारे माहिती मिळेल. मात्र केवळ SMS वर अवलंबून न राहता पोर्टलवरील “अर्जाची स्थिती” (Application Status) या टॅबवर जाऊन अर्ज क्रमांक टाकून निवडीची खात्री करून घ्यावी.

– ऍडमिट कार्ड व हमीपत्राची प्रिंट लॉगिनमध्ये उपलब्ध राहील.

– ऑनलाईन अर्ज करताना अपलोड केलेली कागदपत्रेच पडताळणीसाठी ग्राह्य धरली जातील. त्याच कागदपत्रांच्या मूळ व साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक आहे.

– विहित कालावधीत (२० एप्रिल २०२६ पर्यंत) प्रवेश ऑनलाईन निश्चित करणे बंधनकारक आहे.

– प्रवेश निश्चित झाल्यानंतर पडताळणी समितीकडून रिसीट (Receipt) घेणे आवश्यक आहे.

प्रतीक्षा यादीबाबत :

निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतरच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे SMS द्वारे माहिती दिली जाईल.

प्रवेश प्रक्रियेदरम्यान कोणतीही अडचण आल्यास संबंधित तालुका अथवा महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सक्षम अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *