Power by The Web Cloud Media

हृदयसम्राट बाबा हरदेव सिंह यांना अर्पित ‘समर्पण दिवस’

१३ मे रोजी देशभर विशेष सत्संग

कल्याण

मानवता, प्रेम, विनम्रता आणि आध्यात्मिक जागृतीचे प्रतीक मानले जाणारे युगद्रष्टा बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या पावन स्मृतीस अर्पित ‘समर्पण दिवस’ बुधवार, दि. १३ मे २०२६ रोजी भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा येथे सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून तो सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज तथा श्रद्धेय निरंकारी राजपिताजी यांच्या पावन सान्निध्यात संपन्न होणार आहे.

या प्रसंगी उपस्थित श्रद्धाळूंना सतगुरु माताजींचे आशीर्वचन श्रवण करण्याची संधी लाभणार असून देश-विदेशातून मोठ्या संख्येने भक्तगण, श्रद्धाळू आणि मानवताप्रेमी सहभागी होणार आहेत. श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाची भावांजली अर्पण करत बाबा हरदेव सिंहजी यांच्या दिव्य शिकवणींचे स्मरण करण्यात येईल. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण संत निरंकारी मिशनच्या अधिकृत संकेतस्थळावर करण्यात येणार असून जगभरातील अनुयायांना त्याचा लाभ घेता येणार आहे.

मुंबई महानगर प्रदेशातही ‘समर्पण दिवस’ निमित्त सुमारे ४० ठिकाणी विशेष सत्संग समारोहांचे आयोजन करण्यात आले आहे. कुलाबा ते विरार तसेच डोंबिवली, कल्याण, कसारा, बदलापूर, पनवेल, नवी मुंबई आणि उरण परिसरात स्थानिक भक्तगण एकत्र येऊन बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या दिव्य विचारांतून प्रेरणा घेणार आहेत.

बाबा हरदेव सिंहजी हे केवळ संत निरंकारी मिशनचे आध्यात्मिक गुरु नव्हते, तर ते प्रेम, करुणा, सहजता आणि मानवी संवेदनांचे सजीव प्रतीक होते. त्यांच्या मधुर हास्याने, विनम्र व्यक्तिमत्त्वाने आणि दिव्य वाणीतून असंख्य लोकांना आत्मिक शांततेचा अनुभव दिला. आत्मज्ञानाच्या प्रकाशातून त्यांनी मानवजातीसमोर प्रेम, सेवा, सहअस्तित्व आणि समर्पणाचा संदेश दिला.

त्यांच्या नेतृत्वाखाली संत निरंकारी मिशनने समाजसेवेला अध्यात्माशी जोडत रक्तदान शिबिरे, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, आरोग्यसेवा, शिक्षण, महिला सक्षमीकरण तसेच युवकांना आध्यात्मिक दिशा देणारे विविध लोककल्याणकारी उपक्रम राबविले. समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्यात मिशनने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. “ईश्वरभक्ती ही मानवसेवेतूनच सिद्ध होते,” हा त्यांचा संदेश आजही लाखो अनुयायांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

सुमारे ३६ वर्षांच्या नेतृत्वकाळात बाबा हरदेव सिंहजी यांनी संत निरंकारी मिशनला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून दिली. आज मिशन ६७ हून अधिक देशांमध्ये आध्यात्मिक जागृती, नैतिक मूल्ये आणि मानवकल्याणाचा संदेश प्रभावीपणे पोहोचवत आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे मिशनला आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष मान्यता प्राप्त झाली असून संयुक्त राष्ट्रांच्या सामाजिक व आर्थिक परिषदेचे सल्लागार म्हणूनही मिशनची प्रतिष्ठा निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *