Power by The Web Cloud Media

‘मी हिजडा – मी लक्ष्मी’च्या ब्रेल आवृत्तीचे प्रकाशन

दृष्टिबाधितांपर्यंत पोहोचणार संघर्ष आणि प्रेरणेचा प्रवास

ठाणे

रोटरी क्लब ऑफ ठाणे वेस्ट आणि इनरव्हील क्लब ठाणे वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच विविध रोटरी आणि इनरव्हील क्लबच्या सहकार्याने सुप्रसिद्ध समाजसेविका व लेखिका यांच्या गाजलेल्या आत्मचरित्रात्मक पुस्तक ‘मी हिजडा – मी लक्ष्मी’च्या ब्रेल लिपी आवृत्तीचा भव्य प्रकाशन सोहळा रहेजा गार्डन क्लब हाऊस हॉल, ठाणे येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी रोटरी क्लब ऑफ ठाणे वेस्टचे अध्यक्ष रोटेरियन संतोष कदम यांनी प्रास्ताविक करत या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. दृष्टिबाधित आणि अंध बांधवांपर्यंत तृतीयपंथी समाजाचा संघर्ष, आत्मविश्वास आणि प्रेरणेची कहाणी पोहोचावी या उद्देशाने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पुस्तकाचे ब्रेल लिपीत भाषांतर करणाऱ्या अनुवादक साधना वझे यांनी ब्रेल आवृत्ती तयार करताना आलेले अनुभव आणि त्यामागील भावनिक पैलू उपस्थितांसमोर मांडले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाच्या ब्रेल आवृत्तीचे अधिकृत प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमात नुपूर यांनी ब्रेल आवृत्तीतील काही निवडक उताऱ्यांचे वाचन केले. या वाचनाने उपस्थितांना पुस्तकातील संघर्ष, वेदना आणि जिद्दीचा प्रवास नव्याने अनुभवता आला. पुस्तकाचे शब्दांकन करणाऱ्या लेखिका वैशाली रोठे यांनीही पुस्तक निर्मितीचा प्रवास आणि लक्ष्मी त्रिपाठी यांच्यासोबत काम करतानाचे अनुभव कथन केले.

यावेळी कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी डीजीई रोटेरियन डॉ. निलेश जयवंत यांनी रोटरीच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत, समाजातील वंचित आणि दृष्टिबाधित घटकांसाठी अशा प्रकारचे साहित्य उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले.

मुख्य वक्त्या आणि पुस्तकाच्या लेखिका यांनी आपल्या प्रभावी भाषणातून उपस्थितांशी संवाद साधला. “मी ठाणेकर आहे आणि महाराष्ट्राची आहे याचा मला अभिमान आहे. हे पुस्तक केवळ माझ्या आयुष्याचा प्रवास नाही, तर संपूर्ण तृतीयपंथी समाजाच्या अस्तित्व, सन्मान आणि हक्कांच्या लढ्याची कहाणी आहे. आज ही कथा ब्रेल लिपीतून दृष्टिबाधित वाचकांपर्यंत पोहोचत असल्याचा मला विशेष आनंद आहे,” असे त्या म्हणाल्या.

याप्रसंगी नुपूर, सुचित, अल्पना, वैशाली रोठे, डॉ. निलेश जयवंत आणि लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तपस्या नेवे यांनी केले, तर आभार प्रदर्शन चंद्रकांत कोरडे यांनी केले.

या विशेष सोहळ्यास रोटरी आणि इनरव्हील क्लबचे पदाधिकारी, सदस्य तसेच विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दृष्टिबाधित वाचकांसाठी साहित्य अधिक सुलभ करण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *