Power by The Web Cloud Media

‘मिशन भरारी’ची झेप अवकाशाकडे

५९ विद्यार्थ्यांना इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी हिरवा झेंडा

ठाणे, दि. २७

ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या ‘मिशन भरारी’ या अभिनव उपक्रमातून ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना अक्षरशः आकाशाची जोड मिळाली आहे. निवड झालेल्या ५९ गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या इस्रो अभ्यास दौऱ्यास उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. जिल्हा नियोजन भवन, ठाणे येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमात बोलताना शिंदे यांनी ‘मिशन भरारी’ हा केवळ उपक्रम नसून ग्रामीण विद्यार्थ्यांच्या क्षमतेला पंख देणारा परिवर्तनाचा प्लॅटफॉर्म असल्याचे स्पष्ट केले. “ही मुले म्हणजे आपल्या देशाचे ‘सायन्स सोल्जर्स’ आहेत. जसे सैनिक सीमांचे रक्षण करतात, तसे हे विद्यार्थी देशाचे वैज्ञानिक भविष्य घडवतील,” असे ठामपणे त्यांनी सांगितले. विज्ञान म्हणजे फक्त माहिती नसून ‘का?’ हा प्रश्न विचारण्याची वृत्ती आहे, हीच वृत्ती मोठ्या शोधांना जन्म देते, असेही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नमूद केले.

या अभ्यास दौऱ्यादरम्यान विद्यार्थ्यांना ISRO अंतर्गत कार्यरत विक्रम साराभाई अवकाश केंद्र व थुंबा रॉकेट लाँचिंग स्टेशन यांसारख्या महत्त्वाच्या वैज्ञानिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय केरळ सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्युझियम, प्रियदर्शिनी प्लॅनेटेरियम तसेच कन्याकुमारीतील स्वामी विवेकानंद स्मारक आणि थिरुवल्लुवर पुतळा यांसारख्या ठिकाणांचाही समावेश या सहलीत आहे.

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी ‘मिशन भरारी’ हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिशादर्शक उपक्रम असल्याचे सांगितले. पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण घेतल्यास विद्यार्थ्यांच्या विचारविश्वाला व्यापकता मिळते आणि आत्मविश्वासात वाढ होते, असे त्यांनी नमूद केले.

विशेष म्हणजे, केवळ तीन महिन्यांत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून ९५०० विद्यार्थ्यांमधून ५९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. इयत्ता पाचवी ते आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित स्पर्धा परीक्षेद्वारे ही निवड झाली असून, यामध्ये ५४ मराठी माध्यमातील आणि ५ उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

या अभ्यासदौऱ्यासाठी सुमारे ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, विद्यार्थ्यांना कोणतीही सुविधा कमी पडू नये यासाठी प्रशासन सज्ज आहे. विमान प्रवासासह विविध वैज्ञानिक आणि ऐतिहासिक स्थळांचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

‘मिशन भरारी’ या उपक्रमाचे अनावरण प्रजासत्ताक दिनच्या पार्श्वभूमीवर २६ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले होते. अल्पावधीत प्रत्यक्षात उतरलेल्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या क्षमतेला नवे क्षितिज लाभणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *