Power by The Web Cloud Media

स्मशानभूमीजवळ संशयित हालचाली अन् पोलिसांची रेड

कल्याण

कल्याण पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ३४ कोटी रुपये किमतीचे हेरॉईन जप्त केले आहे. या प्रकरणी मुख्य सूत्रधारासह पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, कल्याण-नाशिक ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे.

१ एप्रिल रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकारी आणि कर्मचारी महात्मा फुले चौक पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत होते. यावेळी कल्याण पश्चिमेतील सांगळेवाडी स्मशानभूमीजवळ दोन संशयित व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना पोलिसांच्या निदर्शनास आल्या. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत दोघांनाही ताब्यात घेतले.

 

तपासादरम्यान आरोपी कासिम अब्दुल सत्तार वसईकर आणि कृष्णा नागप्पा हळेमणी यांच्या ताब्यातून तब्बल ९ किलो २३६ ग्रॅम वजनाचे हेरॉईन जप्त करण्यात आले. या अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत अंदाजे ३४ कोटी रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी पुढील तपास करत या प्रकरणातील आणखी आरोपींना अटक केली. या कारवाईत एकूण पाच आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले असून, या ड्रग्स रॅकेटचा संबंध कल्याण-नाशिक परिसराशी असल्याचे उघड झाले आहे.

या प्रकरणामागे आणखी मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, ड्रग्स पुरवठ्याची साखळी आणि मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यासाठी सखोल तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *