Power by The Web Cloud Media

शिवडीत 234 निरंकारी भक्तांचे उत्साहपूर्ण रक्तदान

मानवसेवेचा अनोखा संदेश

मुंबई

मानवतेच्या सेवेसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या संत निरंकारी मिशनच्या सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने रविवारी शिवडी येथील प्रबोधनकार ठाकरे म्युनिसिपल स्कूलमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात शिवडी आणि परिसरातील निरंकारी भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत तब्बल 234 युनिट रक्तदान केले.

संत निरंकारी ब्लड बँक, विले पार्ले यांच्या सहकार्याने रक्त संकलन करण्यात आले. शिबिराचा शुभारंभ रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत होळकर यांच्या उपस्थितीत निरंकार परमात्म्याच्या प्रार्थनेने करण्यात आला.

या प्रसंगी सेवादलाचे क्षेत्रीय संचालक शंकर सोनवणे, संयोजक केशव पवार यांच्यासह विविध शाखांचे प्रबंधक आणि सेवादल अधिकारी उपस्थित होते. तसेच शिवडीचे नगरसेवक सचिन पडवळ आणि लालबागचे नगरसेवक किरण तावडे यांनी शिबिराला सदिच्छा भेट देत मिशनच्या मानवतावादी उपक्रमांचे कौतुक केले.

स्थानिक मुखी मोहन धुरी यांच्या मार्गदर्शनाखाली सेवादल आणि संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी शिबिराचे यशस्वी आयोजन केले. रक्तदान हे केवळ सामाजिक कर्तव्य नसून मानवतेप्रती असलेल्या नि:स्वार्थ सेवाभावाची अभिव्यक्ती असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

रक्तदानासारख्या उपक्रमांमुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळत असून संत निरंकारी मिशनचे हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *