Power by The Web Cloud Media

डॉ. आंबेडकर उद्यानासाठी वाढीव जागेचा प्रस्ताव

शासनाकडे पाठवण्याचे निर्देश

कल्याण

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे सुशोभीकरण आणि विकास करण्यासाठी वाढीव जागा उपलब्ध करून देण्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक विधानभवन येथे पार पडली. उद्यानालगतची सुमारे २ एकर जमीन उपलब्ध करून देण्यासाठी आरक्षण बदलाचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवावा, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाला दिले.

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत रस्ता रुंदीकरणाच्या कामात उद्यानाची सुमारे २७ गुंठे जागा बाधित झाल्याने, उद्यानाच्या विकासासाठी पर्यायी अथवा वाढीव जागा उपलब्ध करून देण्याची मागणी आंबेडकरी चळवळीतील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती.

या मागणीच्या पार्श्वभूमीवर विधानभवन येथील उपाध्यक्ष कार्यालयाच्या दालनात बैठक घेण्यात आली. बैठकीत उद्यानाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या वाढीव जागेबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी उद्यानालगतची सुमारे २ एकर जमीन उपलब्ध करून देण्यासाठी आरक्षण बदलाचा प्रस्ताव तयार करण्याबाबत निर्देश देण्यात आले.

महापालिका प्रशासनाने संबंधित प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविल्यानंतर त्यावर पुढील कार्यवाही होणार आहे. त्यामुळे उद्यानाच्या विस्तारित विकासासाठी प्रशासकीय प्रक्रियेला सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बैठकीस नगरविकास विभागाचे अधिकारी, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त, नगररचना विभागाचे अधिकारी तसेच आंबेडकरी चळवळीतील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *