बदलापूरचा सोहम साळवे आणि डोंबिवलीची अदिती ठक्कर आता जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना देणार स्पेस रिसर्चचे प्रशिक्षण
ठाणे
ठाणे जिल्ह्यातील दोन विद्यार्थ्यांनी थेट अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. बदलापूरचा सोहम साळवे आणि डोंबिवलीची अदिती प्रवीण ठक्कर यांची ठाणे जिल्ह्याचे ‘स्पेसक्रॅट ॲम्बेसेडर’ म्हणून निवड झाली आहे.
विशेष म्हणजे, स्वतः अंतराळ संशोधनाचा ध्यास घेणारे हे दोन्ही विद्यार्थी आता जिल्ह्यातील इतर शाळकरी विद्यार्थ्यांपर्यंतही स्पेस रिसर्चचे प्रशिक्षण पोहोचवणार आहेत.
लाखो विद्यार्थ्यांमधून निवड; सोहमची उल्लेखनीय कामगिरी
‘स्पेसक्रॅट्स विद्यापीठा’च्या निवड प्रक्रियेत देशभरातील सुमारे १ लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विविध टप्प्यांनंतर १० हजार विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या आणि अंतिम फेरीत १ हजार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या प्रक्रियेत सोहम साळवेने स्थान मिळवत ‘ज्युनिअर सायंटिस्ट’चे विशेष प्रशिक्षण पूर्ण केले.
बदलापूरच्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणाऱ्या सोहमची अंतराळ विज्ञानातील वाटचाल लहान वयातच सुरू झाली. गेल्या तीन वर्षांत त्याने अंतराळ आणि ब्रह्मांड या विषयावर तीन पुस्तके लिहिली आहेत. सध्या तो ‘इंटरनॅशनल सायंटिस्ट प्रोग्राम’च्या दुसऱ्या वर्षात संशोधन करत आहे.
आंतरराष्ट्रीय ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रोफिजिक्स स्पर्धेत त्याने सलग दोन वर्षे सहभाग घेतला. यामध्ये त्याने गतवर्षी सिल्व्हर ऑनर आणि यावर्षी ब्राँझ ऑनर मिळवला. एका लघुग्रहावरही त्याने संशोधन केले आहे. या कामगिरीची दखल घेत त्याला ‘बदलापूर रत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
अदितीने शोधले १६ लघुग्रह
डोंबिवलीची अदिती प्रवीण ठक्कर सध्या के. व्ही. पेंढारकर महाविद्यालयात इयत्ता ११ वीमध्ये शिकत आहे. आठवीपासूनच तिने अवकाश संशोधनाला आपले ध्येय बनवले.
अदितीने आतापर्यंत १६ लघुग्रहांचा शोध लावल्याची माहिती देण्यात आली आहे. तिच्या संशोधनाची अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था NASA हिने दखल घेत आपल्या संकेतस्थळावर त्यासंदर्भातील माहिती प्रसिद्ध केल्याचे सांगण्यात आले आहे.
आता ठाण्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘स्पेस रिसर्च’
सोहम आणि अदिती यांची निवड केवळ त्यांच्या वैयक्तिक यशापुरती मर्यादित राहणार नाही. ठाणे जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांपर्यंत विनामूल्य स्पेस रिसर्च प्रशिक्षण पोहोचवण्याच्या उपक्रमात हे दोघे ‘स्पेसक्रॅट ॲम्बेसेडर’ म्हणून भूमिका बजावणार आहेत.
या उपक्रमातून अंतराळ विज्ञानाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांना लहान वयातच संशोधनाची दिशा मिळावी, हा उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून दोघांचे कौतुक
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सोहम आणि अदिती यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या वैज्ञानिक जिज्ञासेचे, संशोधक वृत्तीचे आणि सोहमच्या पुस्तक लेखनाचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले.
ठाण्यातील दोन विद्यार्थ्यांची ही कामगिरी आता केवळ पुरस्कार किंवा पदकांपुरती न राहता, जिल्ह्यातील आणखी किती विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधनाकडे वळवते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.













Leave a Reply