Power by The Web Cloud Media

दादर बेस्ट बस अपघातात एकाचा मृत्यू

ई-स्कूटरस्वाराचा जागीच मृत्यू, दुचाकीस्वाराची प्रकृती गंभीर

मुंबई

दादर प्लाझा परिसरात झालेल्या बेस्ट बस अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात बेस्ट बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

अपघातात ई-स्कूटरस्वार नियाज अहमद (वय २८) यांचा मृत्यू झाला. त्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. तर दुचाकीस्वार वृषभ गुप्ता (वय २२) याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

याशिवाय पादचारी अमित म्हात्रे (४१), बेस्ट निरीक्षक महेश दोईफोडे (५०), बस चालक विकास पडारे (४२), बस वाहक राजेंद्र पेळेकर (५७) आणि बेस्ट निरीक्षक सतीश वाघमारे (४८) हे जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. अपघातात अनेक वाहनांचे नुकसान झाले असून परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 281, 125, 125(अ), 125(ब), 106 तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अंतर्गत गुन्हा क्रमांक 283/2026 दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *