ठाणे, दि. २२
भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयांतर्गत दिव्यांगजन सक्षमीकरण विभागामार्फत ‘दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार – २०२६’ प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्कारासाठी पात्र दिव्यांग व्यक्ती, संस्था, संघटना तसेच संबंधित घटकांनी ३१ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषद ठाणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी केले आहे.
दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि संघटनांचा गौरव करण्यासाठी केंद्र शासनाकडून दरवर्षी हे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यंदाही विविध श्रेणींमध्ये अर्ज मागविण्यात आले असून अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असणार आहे. प्रत्यक्ष अथवा अन्य माध्यमातून पाठविण्यात आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
अर्जदारांनी राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर उपलब्ध विहित नमुन्यात अर्ज भरून आवश्यक माहिती आणि संबंधित कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे. अर्जासोबत दिव्यांग प्रमाणपत्र, आवश्यक ओळखपत्रे तसेच संबंधित पुरस्कार श्रेणीनुसार मागविण्यात आलेली कागदपत्रे जोडावी लागणार आहेत.
यंदाच्या पुरस्कारांमध्ये ‘सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन’, ‘श्रेष्ठ दिव्यांगजन’ आणि ‘श्रेष्ठ सृजनशील दिव्यांग बालक/बालिका’ यांसह विविध श्रेणींचा समावेश आहे. ‘श्रेष्ठ सृजनशील दिव्यांग बालक/बालिका’ श्रेणीसाठी अर्ज करताना UDID कार्ड किंवा वैध दिव्यांग प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे.
पुरस्कारासाठी पात्रता, निकष, अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल आणि दिव्यांगजन सक्षमीकरण विभाग या अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.
जिल्ह्यातील पात्र दिव्यांग व्यक्ती, संस्था आणि संघटनांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता ३१ जुलै २०२६ पूर्वी अर्ज पूर्ण करावा, असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग, जिल्हा परिषद ठाणे यांनी केले आहे.
याठिकाणी करा ऑनलाइन अर्ज
राष्ट्रीय पुरस्कारासाठी इच्छुकांनी ३१ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावा. अर्जासाठी National Awards Portal या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. पात्रता, मार्गदर्शक सूचना आणि आवश्यक कागदपत्रांची अधिक माहिती http://www.depwd.gov.in आणि http://www.depwd.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.













Leave a Reply