Power by The Web Cloud Media

सम्राट अशोक विद्यालयात लोकशाहीचा प्रत्यक्ष धडा

वर्ग प्रतिनिधी निवडणुकीतून मतदार जनजागृतीचा संदेश

कल्याण

पाली भाषा प्रचार व प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक विद्यालयात लोकशाही पद्धतीने वर्ग प्रतिनिधी निवडणूक पार पडली. मतपत्रिकेच्या माध्यमातून झालेल्या या निवडणुकीत विद्यार्थ्यांनी उमेदवारी अर्ज भरणे, प्रचार करणे, मतदान, मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्यापर्यंतची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवली.

मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी सांगितले की,

इतिहास आणि नागरिकशास्त्राच्या पाठ्यपुस्तकातून विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती दिली जाते. मात्र प्रत्यक्ष लोकसभा, विधानसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकांप्रमाणे वर्ग प्रतिनिधी निवडणूक घेऊन विद्यार्थ्यांना लोकशाहीची कार्यपद्धती अनुभवता आली. तसेच “एक मत किती महत्त्वाचे आहे” हा संदेश विद्यार्थ्यांमार्फत पालकांपर्यंत पोहोचविण्याचाही प्रयत्न करण्यात आला.

निवडणूक प्रक्रियेदरम्यान मतदान अधिकारी म्हणून अभिलाषा कदम, समीक्षा सुपे आणि रिद्धी कदम यांनी जबाबदारी पार पाडली. इतिहास व नागरिकशास्त्र विषयाचे शिक्षक ओमप्रकाश धनविजय यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

निवडणुकीत रुद्र प्रताप जंगम (इयत्ता पाचवी), पियुष निलेश वाडेकर (सहावी), मनस्वी दीपक निकम (सातवी), निधी प्रफुल्ल कदम (आठवी), आयुष गोविंद तपासे (नववी) आणि स्वयंम बाळकृष्ण जाधव (दहावी) हे विद्यार्थी बहुमताने वर्ग प्रतिनिधी म्हणून निवडून आले.

निकाल जाहीर होताच विजयी विद्यार्थ्यांनी पुष्प पाकळ्यांची उधळण करत जल्लोष केला. या आनंदोत्सवात शिक्षकांनीही सहभागी होत विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *