QR कोडद्वारे शपथ, जनजागृती रॅलीचे आयोजन
डोंबिवली
मुंबईला अंमली पदार्थमुक्त करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘Drug Free Mumbai’ जनजागृती अभियानांतर्गत गुरुवार, ३० जुलै २०२६ रोजी डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात QR कोडद्वारे शपथविधी आणि जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.
माननीय कार्यालयाच्या निर्देशानुसार सकाळी ११.०० ते १२.०५ या वेळेत डोंबिवली रेल्वे स्थानकासमोरील परिसर तसेच पादचारी पुलावर हा उपक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी रेल्वे पोलीस अधिकारी व कर्मचारी, रेल्वे प्रवासी, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला दक्षता समितीचे सदस्य, पोलीस मित्र तसेच नागरिकांनी अंमली पदार्थविरोधी शपथ घेतली.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी QR कोड स्कॅन करून ‘Drug Free Mumbai’ अभियानाची ऑनलाइन शपथ घेतली. त्यानंतर सर्वांच्या सहभागातून रेल्वे स्थानक परिसरात अंमली पदार्थविरोधी जनजागृती रॅली काढण्यात आली.
या अभियानाचा प्रमुख उद्देश अंमली पदार्थमुक्त मुंबई घडविणे, रेल्वे प्रवाशांमध्ये जनजागृती निर्माण करणे आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविणे हा होता. कार्यक्रमाला व्यापक प्रसिद्धी मिळावी यासाठी पत्रकारांनाही निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी कार्यक्रमाचे चित्रीकरण व वृत्तांकन केले.
या उपक्रमात वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब थोरात, २ पोलीस अधिकारी, २३ पोलीस अंमलदार, २५ महाविद्यालयीन विद्यार्थी, १२ पोलीस मित्र सदस्य, तसेच ३० ते ३५ रेल्वे प्रवासी आणि पत्रकार बांधव उपस्थित होते.
डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात झालेल्या या जनजागृती अभियानाला रेल्वे प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब थोरात यांनी सांगितले.













Leave a Reply