आंबिवलीत खडकपाडा पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन;
४० ग्रॅम MDसह वॉन्टेड आरोपी अटकेत
कल्याण
आंबिवली येथील इराणी वस्तीत खडकपाडा पोलिसांनी बुधवारी सकाळी विशेष कोंबिंग ऑपरेशन राबवत तीन वॉन्टेड आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये मोहम्मद गुलाम हुसेन जाफ्री ऊर्फ शाहरुख (वय ३५) याच्याकडून ४० ग्रॅम मेफेड्रोन (MD) जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या मुद्देमालाची किंमत सुमारे ८ लाख रुपये असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
तीन वॉन्टेड आरोपी पोलिसांच्या ताब्यात
आंबिवलीतील इराणी वस्तीमध्ये वॉन्टेड आणि फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी हे विशेष कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले. या कारवाईत एक पुरुष आणि दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
मुख्य आरोपी मोहम्मद गुलाम हुसेन जाफ्री ऊर्फ शाहरुख (३५) हा आंबिवलीतील इराणी वस्तीत राहणारा असून, तो कल्याण ग्रामीण आणि वाकड पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या सहा गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याविरोधात बेकायदेशीर जमाव जमवणे, चोरी, फसवणूक आणि जबरी चोरी यांसारख्या गुन्ह्यांची नोंद असल्याचे समोर आले आहे.
कारवाईदरम्यान जाफ्रीकडून ४० ग्रॅम मेफेड्रोन (MD) जप्त करण्यात आले. त्यानंतर खडकपाडा पोलिसांनी त्याच्याविरोधात NDPS कायद्यांतर्गत स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता १५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दोन महिला आरोपीही अटकेत
या कारवाईत शमा तहजीब इराणी (वय ३८) आणि नफिसा हाश्मी इराणी (वय ३३) या दोन महिलांनाही ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, शमा तहजीब इराणी ही आंबिवलीतील पाटील नगर परिसरात राहते. तिच्याविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात २०२४ मध्ये गुन्हा दाखल असून, त्यामध्ये भारतीय न्याय संहिता (BNS), रेल्वे कायदा आणि Criminal Amendment Act मधील तरतुदींचा समावेश आहे.
तर नफिसा हाश्मी इराणी ही आंबिवलीतील इराणी वस्तीत राहते. तिच्याविरोधात माणपाडा पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल झालेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यात MCOCAच्या तरतुदीही लागू करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
७२ पोलिसांचा सहभाग
या विशेष कोंबिंग ऑपरेशनसाठी पोलिसांनी पाच पथके तयार केली होती. सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली.
खडकपाडा, बाजारपेठ, महात्मा फुले चौक आणि कोळसेवाडी पोलीस ठाण्यांची पथके तसेच पोलीस उपायुक्त कार्यालयातील विशेष कृती पथक या कारवाईत सहभागी झाले होते. एकूण १७ पोलीस अधिकारी आणि ५५ पोलीस कर्मचारी, अशा ७२ पोलिसांनी या ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला.
आंबिवलीत पोलिसांची कारवाई तीव्र
आंबिवलीतील इराणी वस्तीमध्ये पोलिसांकडून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आणि वॉन्टेड आरोपींच्या शोधासाठी कारवाई सुरू आहे. या कोंबिंग ऑपरेशनमुळे तीन वॉन्टेड आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.













Leave a Reply