भूमिपुत्रांना १३८.४५ कोटींचा मोबदला
३५ वर्षांपासून प्रलंबित भूसंपादनाचा प्रश्न निकाली; प्रकल्पबाधितांना मोबदला पत्रांचे वाटप
कल्याण
ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीला जोडणाऱ्या महत्त्वाच्या कल्याण-शिळफाटा रस्त्याच्या रुंदीकरणातील भूसंपादनाचा अडथळा दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रस्ता रुंदीकरणासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या मोबदल्यापोटी प्रकल्पबाधित स्थानिक शेतकरी आणि भूमिपुत्रांना १३८.४५ कोटी रुपयांचा मोबदला देण्यास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) मंजुरी देण्यात आली आहे.
तब्बल ३५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुंबईत प्रकल्पबाधित भूमिपुत्रांना मोबदला पत्रांचे वाटप करण्यात आले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच MSRDCचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांच्या हस्ते ही मोबदला पत्रे सुपूर्द करण्यात आली.
भूसंपादनाच्या मोबदल्यामुळे कामाला गती मिळण्याची शक्यता
कल्याण-शिळफाटा मार्गाचे सहापदरीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम MSRDCच्या माध्यमातून सुरू आहे. मात्र, रस्ता प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला प्रलंबित असल्याने काही प्रकल्पबाधित शेतकरी आणि स्थानिकांनी कामाला विरोध केला होता.
मोबदल्याचा प्रश्न सुटल्याने रखडलेल्या कामाला आता गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या मार्गावरील काटई नाका, पलावा चौक आणि शिळफाटा परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याने या रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण होणे महत्त्वाचे मानले जात आहे.
खासदार शिंदे आणि आमदार मोरे यांच्या पाठपुराव्याचा दावा
स्थानिक भूमिपुत्रांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राज्य शासन आणि संबंधित विभागांसोबत बैठका घेतल्याचे सांगण्यात आले. तसेच कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनीही प्रशासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा केल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या पाठपुराव्यानंतर प्रकल्पबाधितांना १३८.४५ कोटी रुपयांचा मोबदला देण्यास मंजुरी मिळाल्याचे सांगण्यात आले आहे.
मंगळवारी झालेल्या कार्यक्रमाला एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, मनसेचे माजी आमदार राजू पाटील, महापौर हर्षदा चौधरी, गोपाळ लांडगे तसेच जमीनमालक उपस्थित होते.
उर्वरित मोबदल्याचे वाटपही लवकरच करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला जमिनीचा मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने प्रकल्पबाधित भूमिपुत्रांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
वाहतूक कोंडी कमी होणार?
भूसंपादन आणि मोबदल्याचा प्रश्न निकाली निघाल्यास कल्याण-शिळफाटा रस्त्याच्या रखडलेल्या सहापदरीकरण आणि काँक्रिटीकरणाच्या कामाला गती मिळू शकते.
काम पूर्ण झाल्यानंतर कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूरहून नवी मुंबई, ठाणे आणि मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. या मार्गावरील वाहतूक प्रवाह सुधारण्यासोबतच प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होण्याची शक्यता आहे.
याशिवाय या मार्गाशी संबंधित मेट्रो १२ आणि मेट्रो १२अ प्रकल्पांच्या कामालाही यामुळे मदत होऊ शकते.













Leave a Reply