Power by The Web Cloud Media

कोपरगावातील पाणी साचण्याच्या समस्येला दिलासा

नगरसेविका ज्योती पवन पाटील यांच्या निधीतून बंदिस्त गटाराच्या कामांचा शुभारंभ

डोंबिवली

कोपरगाव परिसरातील नागरिकांना अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या पावसाळ्यातील पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नगरसेविका ज्योती पवन पाटील यांच्या नगरसेवक निधीतून महत्त्वाच्या विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष नंदकिशोर परब यांच्या हस्ते या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

कोपरगावातील विद्युत बिल्डिंग परिसर आणि कोपर रोडवरील राघवेंद्र स्वामी मठ गल्ली येथे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने नागरिकांना दरवर्षी त्रास सहन करावा लागत होता. अनेकदा पाणी इमारतींमध्ये शिरत असल्याने मालमत्तेचे नुकसान होत होते. तसेच रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सातत्यपूर्ण मागणीची दखल घेत दोन्ही ठिकाणी बंदिस्त (अंडरग्राउंड) गटार बांधून पावसाचे साचणारे पाणी मुख्य नाल्याशी जोडण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. हे काम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील पाणी साचण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

 नगरसेविका ज्योती पवन पाटील 

नगरसेवक निधीतून सुरू होणारे हे पहिले विकासकाम असून, याचा मला आनंद आणि अभिमान आहे. पुढील काळातही रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवून अधिकाधिक विकासकामे मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध राहीन.

भूमिपूजन कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *