सिकलसेल विशेष मोहीम | १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६
विशेष लेख : जिल्हा परिषद, ठाणे यांच्याकडून
सिकलसेल अॅनिमिया हा केवळ एका व्यक्तीचा आजार नाही, तर तो कुटुंब, समाज आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसमोरील एक मोठे आव्हान आहे. हा आजार दीर्घकालीन, गंभीर आणि अनुवंशिक स्वरूपाचा असून योग्य वेळी निदान, प्रतिबंधात्मक उपाय आणि प्रभावी जनजागृतीच्या माध्यमातून त्यावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. याच उद्देशाने भारत सरकारने २०४७ पर्यंत सिकलसेल मुक्त भारत हे महत्त्वाकांक्षी ध्येय निश्चित केले आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनामार्फत १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सिकलसेल तपासणी विशेष अभियान राबविण्यात येत आहे.
सिकलसेल आजाराचे स्वरूप
सामान्यतः लाल रक्तपेशी गोलाकार, लवचिक असतात आणि रक्तवाहिन्यांमधून सहजपणे प्रवास करून शरीराच्या प्रत्येक भागाला ऑक्सिजन पुरवतात.
मात्र सिकलसेल अॅनिमियामध्ये या पेशी चंद्रकोरीसारख्या (विळ्याच्या) आकाराच्या, कडक व चिकट बनतात. त्यामुळे त्या रक्तवाहिन्यांमध्ये अडकून ऑक्सिजनचा प्रवाह अडवतात. परिणामी तीव्र वेदना, अवयवांचे नुकसान आणि जीवघेण्या गुंतागुंती निर्माण होतात.
भारत, महाराष्ट्र आणि ठाणे जिल्ह्यातील स्थिती
भारत सिकलसेल रुग्णसंख्येत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
सुमारे १ कोटी ८० लाख लोक वाहक
१४ लाखांहून अधिक प्रत्यक्ष रुग्ण
महाराष्ट्रात देशातील १५ टक्क्यांहून अधिक सिकलसेल रुग्ण आढळतात.
२०१९ ते २०२५ या कालावधीत राज्यात
१२,४२० रुग्ण
१,२४,२७५ वाहक (Carrier) नोंदविण्यात आले आहेत.
ठाणे जिल्ह्यात २०२१ ते नोव्हेंबर २०२५ दरम्यान
४,५३,४०३ नागरिकांची तपासणी
१,०३५ वाहक
३७ रुग्ण आढळले आहेत.
२००९ पासून आजअखेर जिल्ह्यात एकूण ११४ सिकलसेलग्रस्त रुग्ण नोंदवले गेले आहेत.
अनुवंशिकता आणि विवाहपूर्व तपासणी
सिकलसेल हा संसर्गजन्य नसून अनुवंशिक आजार आहे. पालकांकडून जनुकांद्वारे तो पुढील पिढीपर्यंत पोहोचतो.
विशेषतः रक्तसंबंधीय विवाह या आजाराच्या प्रसाराचा धोका वाढवतात.
सिकलसेलचे प्रकार
AS (वाहक) : स्वतः निरोगी, पण पुढील पिढीला आजार देऊ शकतात
SS (रुग्ण) : गंभीर लक्षणांनी ग्रस्त
दोन्ही पालक वाहक असल्यास अपत्य रुग्ण होण्याची शक्यता २५ टक्के असते.
यासाठी शासनाने पांढरे (निरोगी), पिवळे (वाहक) आणि लाल (रुग्ण) अशी रंगीत कार्ड प्रणाली सुरू केली आहे.
बालकांमधील लक्षणे
सिकलसेलची लक्षणे बाळाच्या ६ महिन्यांपासून दिसू शकतात.
मुख्य लक्षणे
- हातापायांच्या बोटांना सूज
- तीव्र वेदना
- सतत थकवा
- वजन न वाढणे
- वारंवार संसर्ग
- न्यूमोनिया, मेनिंजायटीससारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो.
- वेळीच HPLC / Electrophoresis तपासणी केल्यास योग्य उपचार शक्य होतात.
सिकलसेल क्रायसिस – धोक्याची घंटा
‘सिकलसेल क्रायसिस’ ही सर्वात गंभीर अवस्था आहे. रक्तवाहिन्यांतील अडथळ्यांमुळे छाती, हाडे, पाठ व सांध्यांमध्ये तीव्र वेदना होतात.
याचे परिणाम
- मेंदू : लहान वयात स्ट्रोक
- फुफ्फुसे : Acute Chest Syndrome
- मूत्रपिंड, डोळे, यकृत, पित्ताशय यांवर गंभीर परिणाम
- वारंवार क्रायसिस झाल्यास मृत्यूचा धोका संभवतो.
२०४७ निर्मूलन लक्ष्य आणि विशेष अभियान
- २०४७ पर्यंत सिकलसेल निर्मूलनासाठी देशभर ७ कोटी लोकांचे स्क्रीनिंग केले जाणार आहे.
- महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यांमध्ये हे अभियान प्रभावीपणे राबवले जात आहे.
१५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान
- मोफत तपासणी
- औषधोपचार
- समुपदेशन
- गरोदर मातांची विशेष तपासणी
उपचार आणि जीवनशैली
- सिकलसेलवर कायमस्वरूपी इलाज नसला, तरी हायड्रॉक्स्युरिया हे प्रभावी औषध आहे.
- यामुळे वेदनादायक झटके ५०% पर्यंत कमी होतात.
- फॉलिक अॅसिड
- आवश्यकतेनुसार रक्त संक्रमण
- नियमित वैद्यकीय देखरेख
- बनावट उपचारांपासून दूर राहणे
समुपदेशन आणि सामाजिक जबाबदारी
- लवकर निदान आणि योग्य समुपदेशनामुळे योग्य विवाह निर्णय व सुरक्षित गर्भधारणा शक्य होते.
- भरपूर पाणी, संतुलित आहार, अति उष्णता, थंडी टाळणे, हलका व्यायाम आणि सकारात्मक मानसिकता रुग्णांचे जीवनमान सुधारते.
महाराष्ट्र शासनामार्फत विविध सामाजिक व आरोग्य योजना राबविल्या जात आहेत. सिकलसेल निर्मूलन ही केवळ शासनाची नव्हे, तर समाजाची सामूहिक जबाबदारी आहे.
आज तपासणी. उद्याचे निरोगी भविष्य!
चला, सिकलसेलमुक्त भारताच्या राष्ट्रीय मोहिमेत सहभागी होऊया.
संजय प्रभाकर जाधव
जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी
जिल्हा परिषद ठाणे, आरोग्य विभाग.













Leave a Reply