खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला यश
कल्याण
कोकण रेल्वे मार्गावरील लाखो प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेत भारतीय रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्सप्रेस रेल्वे सेवा सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे मुंबई आणि कोकणदरम्यानचा रेल्वे प्रवास अधिक सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या रेल्वे सेवेसाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नव्या रेल्वे सेवेला मंजुरी दिली. या निर्णयाबद्दल दोन्ही खासदारांनी रेल्वेमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
‘आझादी का अमृत महोत्सव’ उपक्रमांतर्गत ही नवीन रेल्वे सेवा सुरू करण्यात येत असून, कोकण रेल्वेवरील वाढती प्रवासी संख्या आणि वाढती मागणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीतही या मार्गावर नवीन दैनिक एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती.
भारतीय रेल्वेने या सेवेसाठी गाडी क्रमांक 15087 सीएसएमटी–सावंतवाडी रोड एक्सप्रेस आणि गाडी क्रमांक 15088 सावंतवाडी रोड–सीएसएमटी एक्सप्रेस अशी क्रमांकवारी निश्चित केली आहे. या गाडीचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
सुमारे ५१० किलोमीटर अंतराच्या या मार्गामुळे मुंबई महानगर क्षेत्र आणि कोकणातील प्रमुख शहरांदरम्यान थेट रेल्वे संपर्क अधिक मजबूत होणार आहे. पर्यटन, शिक्षण, रोजगार, व्यापार तसेच वैयक्तिक कारणांसाठी प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना या सेवेचा लाभ होण्याची अपेक्षा आहे.
कोकण किनारपट्टीवरील पर्यटनस्थळे, समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले आणि धार्मिक स्थळांपर्यंत पोहोचणे अधिक सोयीचे होणार असून, पर्यटन उद्योगालाही चालना मिळू शकते. तसेच विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि नियमित प्रवाशांसाठीही ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे.
प्रस्तावित थांबे
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, वालिवाडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड.













Leave a Reply