शासकीय योजना व सेवांसाठी एकच डिजिटल व्यासपीठ उपलब्ध
ठाणे, दि. १८
दिव्यांग कल्याण विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने विकसित करण्यात आलेले “दिव्यांग सहाय्यक पोर्टल (Divyang Sahayak Portal)” हे दिव्यांग व्यक्तींना विविध शासकीय योजना, सेवा व लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे ‘सिंगल विंडो’ डिजिटल व्यासपीठ असून या पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या पोर्टलच्या माध्यमातून दिव्यांग नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया व सेवांचा लाभ ऑनलाईन पद्धतीने सहजपणे घेता येणार आहे. यामुळे वारंवार शासकीय कार्यालयात जाण्याची गरज कमी होऊन घरबसल्या सेवा मिळणे शक्य होणार आहे. पारदर्शक, कार्यक्षम व कालबद्ध सेवा वितरण सुनिश्चित करण्यासाठी या पोर्टलवर प्रमाणित डिजिटल प्रणालीचा वापर करण्यात येत आहे.
दिव्यांग सहाय्यक पोर्टलचा मुख्य उद्देश दिव्यांग नागरिकांना शासकीय सेवा सुलभ, सुसंगत व एकत्रित स्वरूपात उपलब्ध करून देत त्यांचे सक्षमीकरण करणे हा आहे.
शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी https://divyangsahayakportal.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर नोंद करणे बंधनकारक आहे. तसेच ज्या दिव्यांग व्यक्तीकडे UDID कार्ड आहे त्याची UDID पोर्टलवर E-KYC करणे आवश्यक आहे.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
दिव्यांग बांधवांनी पोर्टलवर नोंदणी करताना ‘नागरिक लॉगिन’द्वारे माहिती भरावी. त्यासाठी पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत :
• आधार कार्ड
• यूडीआयडी (UDID) कार्ड (दिव्यांगत्व ४०% पेक्षा जास्त असणे आवश्यक)
• पासपोर्ट आकाराचा फोटो
• मोबाईल क्रमांक
• बँक खात्याचे तपशील
• इतर संबंधित कागदपत्रे
नोंदणी केल्यानंतर दिव्यांग नागरिकांना विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध होईल.
स्वयंसेवी संस्थांसाठी नोंदणी अनिवार्य
दिव्यांग क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थांनी (NGO) देखील या पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत २७ स्वयंसेवी संस्थांनी नोंदणी पूर्ण केली असून ज्या संस्थांची नोंदणी प्रलंबित आहे त्यांनी तात्काळ नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे रणजित यादव यांच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी तसेच स्वयंसेवी संस्थांनी या पोर्टलवर लवकरात लवकर नोंदणी करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, ठाणे उज्वला सपकाळे
दिव्यांग नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी हे पोर्टल अत्यंत उपयुक्त ठरणार असून नोंदणी प्रक्रियेत कोणतीही अडचण आल्यास संबंधितांनी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग, ठाणे या कार्यालयाशी संपर्क साधावा.
दिव्यांग नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना शासकीय सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी ही डिजिटल प्रणाली महत्त्वपूर्ण ठरणार असल्याने सर्वांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.













Leave a Reply