हिंगोली
ग्रामीण महिला स्वयंसहाय्यता समूहांनी तयार केलेल्या “हिंगोलीचे पिवळे सोने” या हळद आधारित ब्रँडला राज्य व देशपातळीवर नवी ओळख मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषद हिंगोली आणि उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या उपकर्णधार कु. गंगा कदम यांची या ब्रँडच्या ब्रँड अॅम्बेसेडरपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
याबाबत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा परिषद हिंगोली यांनी अधिकृत पत्राद्वारे माहिती दिली. गंगा कदम यांच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील उल्लेखनीय कामगिरीसह क्रीडा क्षेत्रातील योगदान आणि युवकांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व लक्षात घेऊन ही नियुक्ती करण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
“हिंगोलीचे पिवळे सोने” या ब्रँडअंतर्गत ग्रामीण महिला बचत गटांकडून उत्पादित करण्यात येणाऱ्या हळद उत्पादनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी गंगा कदम विविध कार्यक्रम, जनजागृती उपक्रम तसेच सामाजिक माध्यमांद्वारे सहकार्य करणार आहेत. यासाठी दोन्ही पक्षांमध्ये नॉन फायनान्शियल सामंजस्य करारही करण्यात आला आहे.
या सहकार्यामुळे “हिंगोलीचे पिवळे सोने” या ब्रँडला राज्यासह देशपातळीवर नवी ओळख मिळेल, असा विश्वास जिल्हा परिषद प्रशासनाने व्यक्त केला आहे.













Leave a Reply