Power by The Web Cloud Media

शास्त्रीनगर प्रकरण : IMA कल्याणने आयुक्तांना दिले निवेदन

दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी

कल्याण

शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांवर झालेल्या शारीरिक व शाब्दिक मारहाणीच्या घटनेचा इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) कल्याण यांनी तीव्र निषेध व्यक्त केला असून, संबंधित आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

याबाबत IMA कल्याणचे अध्यक्ष डॉ. राजेश राघवराजू, सचिव डॉ. हिमांशू ठक्कर आणि खजिनदार डॉ. स्वाती शेलार यांनी महापालिका आयुक्त अभिजीत गोयल यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, रुग्णसेवा बजावत असताना डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर होणारी हिंसा, धमक्या आणि गैरवर्तन कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. अशा घटना केवळ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेलाच धोका निर्माण करत नाहीत, तर अत्यावश्यक वैद्यकीय सेवांवरही विपरीत परिणाम करतात.

या प्रकरणातील आरोपींविरुद्ध तातडीने एफआयआर दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच केडीएमसीच्या अखत्यारीतील सर्व रुग्णालयांमध्ये डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणीही IMAने केली आहे.

याशिवाय, योग्य आणि तातडीची कारवाई न झाल्यास IMA कल्याणसह कल्याण डोंबिवलीतील खासगी डॉक्टर व खासगी रुग्णालये एकत्रित आंदोलन छेडतील. आवश्यक असल्यास वैद्यकीय सेवा बंद ठेवून संपाचा मार्ग स्वीकारण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

IMA कल्याणने प्रशासनाने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दोषींवर त्वरित आणि कठोर कारवाई करावी, तसेच प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्याला न्याय, सुरक्षा आणि सन्मान मिळावा, अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *