डोंबिवली
पश्चिमेतील साईनगर परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या तीव्र पाणीटंचाईविरोधात संतप्त महिलांनी आज कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ह प्रभाग क्षेत्र कार्यालयावर हंडा-कळशी मोर्चा काढत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
साईनगर परिसरात नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना टँकर किंवा इतर पर्यायांवर अवलंबून राहावे लागत असून महिलांना घरगुती कामांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
हातात हंडे आणि कळशा घेऊन महिलांनी ह प्रभाग कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी स्थानिक नागरिकांसह विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांनी पालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत तात्काळ पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.
गेल्या तीन महिन्यांपासून वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना केली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. पाणीटंचाईसाठी थेट पालिका प्रशासनालाच जबाबदार धरत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
यावेळी आंदोलकांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. लवकरात लवकर प्रश्न मार्गी न लावल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला. दरम्यान, नागरिकांच्या मागण्यांची दखल घेत आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन पालिका अधिकाऱ्यांनी दिले.













Leave a Reply