Power by The Web Cloud Media

निळजे–डोंबिवली बससेवा पुन्हा सुरू!

मनसेच्या पाठपुराव्याला यश

डोंबिवली
लोढा हेवन, निळजे परिसरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. अनेक दिवसांपासून बंद असलेली निळजे ते डोंबिवली रेल्वे स्थानक बससेवा अखेर पुन्हा सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा माजी आमदार राजू (प्रमोद) पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर परिवहन विभागाने हा निर्णय घेतला.

स्थानिक नागरिकांनी बससेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी राजू पाटील यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत त्यांनी परिवहन विभागाशी पाठपुरावा केला आणि संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर आजपासून बससेवा पूर्ववत सुरू करण्यात आली.

यावेळी बसमार्गावरील अतिक्रमण, फेरीवाल्यांचा त्रास आणि अवैध पार्किंगमुळे वाहतुकीस निर्माण होणारे अडथळे याबाबतही अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. बससेवा नियमित सुरू राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

मनसेने प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला असून, फेरीवाले आणि अवैध पार्किंगमुळे बससेवा पुन्हा बंद झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे.

पहिल्या फेरीच्या शुभारंभप्रसंगी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष योगेश पाटील, विभाग अध्यक्ष रोहित भोईर, विभाग सचिव दीपक पवार, समाजसेवक निवृत्ती पाटील, पुष्पाताई भोर, अनुज दिवेकर, अशोक गायकर, राजेश काशीकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, नागरिक आणि प्रवासी उपस्थित होते. चालक व वाहकांचा सत्कार करून बससेवेला शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *